अवकाळीनंतरही टाळता येईल फळपिकांवरील संकट

भास्कर लांडे - सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 मार्च 2017

परभणी कृषी विद्यापीठाचा सल्ला, फवारणी, खतासह सुचविल्या उपाययोजना

परभणी- भरघोस आणि हक्काच्या उत्पन्नाची नगदी फळपिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांच्या धडपडीला परभणी कृषी विद्यापीठाने सल्लारूपी हातभार लावण्याचा प्रयत्न केला. अगदी हाताशी आलेला घास पदरात पाडण्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी विविध उपाययोजना करताना दिसत आहेत. रब्बी हंगामातील धान्यवर्गीय पिकांपेक्षा नगदी उत्पादनावर आगामी खरिपाची पेरणी अवलंबून आहे.

परभणी कृषी विद्यापीठाचा सल्ला, फवारणी, खतासह सुचविल्या उपाययोजना

परभणी- भरघोस आणि हक्काच्या उत्पन्नाची नगदी फळपिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांच्या धडपडीला परभणी कृषी विद्यापीठाने सल्लारूपी हातभार लावण्याचा प्रयत्न केला. अगदी हाताशी आलेला घास पदरात पाडण्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी विविध उपाययोजना करताना दिसत आहेत. रब्बी हंगामातील धान्यवर्गीय पिकांपेक्षा नगदी उत्पादनावर आगामी खरिपाची पेरणी अवलंबून आहे.

ज्वारीचे कोठार म्हणून ओळख असलेल्या परभणीने नगदी पिकांकडे वळायला सुरवात केली. म्हणूनच कापसापेक्षा सोयाबीन आणि अन्नधान्यापेक्षा भाजीपाला अन्‌ फळपिके घेण्याचा कल जिल्ह्यात वाढला. योगायोगाने पाऊसपाणी उत्तम झाल्याने रब्बी पिकांबरोबर फळपिकांच्या क्षेत्रात उल्लेखनीय वाढ झाली. आंबा, संत्री, मोसंबी, टरबूज आणि डाळिंबापैकी काही पिके बहरात तर काही फुलोऱ्यात आहेत. दुसरीकडे कांदा आणि उन्हाळी भुईमूग ही नगदी पिके जोमात आहेत. दरम्यान, बुधवारी (ता.15) झालेल्या अवकाळी पावसासह सोसाट्याच्या वाऱ्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. संत्री, मोसंबी, डाळिंबाच्या फांद्या मोडल्या तर फळे गळून पडली. आंब्याचा बहर गळाला. कांद्यात पाणी साचले. याहीपेक्षा आता या वातावरणामुळे रोगराईचा प्रादुर्भाव वाढला. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढत असून, बहुतांश ठिकाणी गारपिटीमुळे झाडांना, फळांना मार लागला. त्या झाडांवर बुरशी वाढण्याची दाट शक्‍यता असल्याने तत्काळ उपाययोजनांशिवाय पर्याय नाही. अशा परिस्थितीमध्ये शेतावर उभी असलेली विविध फळपिके, वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये आणखी नुकसान होणार नाही, याची काळजी वाहण्यास सांगितली. फवारणी, खत, झाडांना आधार देत पिके वाचविण्यासाठी विविध उपाययोजना सुचविल्या. तत्काळ त्याचा अवलंब करण्याचा सल्ला विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, विस्तार कृषिविद्यावेत्ता प्रा. ए. व्ही. गुट्टे यांनी दिला आहे.

पिके आणि त्यावरील उपाययोजना
मोसंबी ः वादळी वाऱ्यामुळे मोडलेल्या फांद्या काढून टाकाव्यात व त्या ठिकाणी त्वरित बोडो पेस्ट लावून घ्यावे. मार लागलेल्या झाड, फळांवर बुरशी वाढू नये म्हणून झाडावर कार्बेन्डॅझीम 10 ग्रॅम किंवा मेटॅलॅक्‍झील आठ टक्‍के अधिक मॅन्कोझेब 64 टक्‍के (रेडोमिल) 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी.
डाळिंब ः ढगाळ वातावरणामुळे डाळिंब पिकांवर सरकोस्पोरा व पानावरील अल्टरनेरियाचे ठिपके हे बुरशीजन्य रोग वाढण्याची शक्‍यता असते. त्यासाठी कोसास्रड 101 किंवा थायोफेनेट मिथाईल (रोको) 20 ग्रॅम अधिक बॅक्‍टीनाशक पाच ग्रॅम (दोन ब्रोमो, दोन नायट्रोप्रोपीन एक - तीन डायोल) प्रति 10 लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी. आंबे बहारात ज्या डाळिंब पिकांवरील मादी फुलाची गळ मोठ्या प्रमाणावर झालेली आहे, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी तापमानातील वाढ होण्याची वाट बघावी. तापमानातील वाढीबरोबर नवीन कळी फुटते तोच उशिराचा आंबेबहार कायम करावा.
आंबा ः भुरी, तुडतुड्याच्या नियंत्रणासाठी डायमिथोएट 15 मिलि अधिक कार्बेन्डॅझीम 10 ग्रॅम पाण्यात मिसळून फवारणी करावी. फळगळ थांबविण्यासाठी लिंबाच्या आकाराची फळे असताना एन.ए.ए. (फ्लॅनोफिक्‍स) दोन मिलि प्रति 10 लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी. फळाची प्रत सुधारण्यासाठी युरिया 100 ग्रॅम अधिक पोटॅशियम नायट्रेट (13:00:45) 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी फवारणी करावी.
कलिंगड, खरबूज ः भुरीच्या नियंत्रणासाठी हेक्‍झाकोनॅझॉल (कॉन्टॉप) 10 मिलि किंवा ट्रायडेमार्क (कॅलॅक्‍झीन) 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात फवारणी करावी. डावणी व केवडा रोगाच्या नियंत्रणासाठी मेटॅलॅक्‍झील आठ टक्‍के अधिक मॅन्कोझेब 64 टक्‍के (रेडोमिल गोल्ड) हे मिश्रण 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावे.
कांदा ः करपा व फुलकिडे यांच्या नियंत्रणसाठी फिप्रोनिल पाच टक्‍के (रिजेन्ट) 15 मिलि अधिक क्‍लोरोथॅलोनिल (कवच) 25 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी.
उन्हाळी भुईमूग ः बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी डायथेन एम 45, 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी.

Web Title: Parbhani Agricultural University advice