
Parbhani News : कृषी विद्यापीठात दोन दिवसीय कार्यशाळा
परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात ग्राफ्टिंग रोबोटद्वारे पालेभाज्या व फळवर्गीय रोपांचे कलमीकरणाची दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा नुकतीच झाली.
कार्यशाळेचे उद्घाटन शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर साऊथ कोरियाच्या एचआरसी कंपनीचे तज्ज्ञ जेरेमी एच. जे. पार्क व नाहेप प्रकल्पाचे मुख्य अन्वेषक डॉ. गोपाल शिंदे, भाजीपाला संशोधन केंद्राचे डॉ. विश्वंभर खंदारे आदींची उपस्थिती होती.
डॉ. धर्मराज गोखले म्हणाले की, डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनेक शेतीची कामे काटेकोरपणे आपण करून शकतो. प्रगत देशात यंत्रमानवाच्या मदतीने अनेक शेतकामे केली जातात. भारतातही डिजिटल शेती तंत्रज्ञानाचा विकासाकरिता प्रयत्न केला जात आहे. रोबोटद्वारे पालेभाज्या व फळवर्गीय रोपांचे कलमीकरण करणे शक्य होत आहे, सदर यंत्रमानवाच्या साहाय्याने कमी वेळेत दर्जेदार रोपांचे कलमीकरण होते.
नाहेप प्रकल्प प्रमुख डॉ. गोपाळ शिंदे यांनी नाहेप प्रकल्पाविषयी शेतकरी, नर्सरी उद्योजक यांना माहिती दिली. कार्यशाळेत हेल्पर रोबोटेक कंपनी, साऊथ कोरीया येथील संशोधक जेरेमी एच. जे. पार्क यांनी कलमीकरण रोबोट विषयी मार्गदर्शन करुन टोमॅटो व वांगी रोपांच्या रोबोटद्वारे कलमीकरणाचे प्रात्याक्षिक करुन दाखविले. कार्यशाळेसाठी २५ नर्सरी उद्योजक व शेतकरी यांनी सहभाग नोंदविला होता.