बसगाड्यावर लावले संभाजीनगरचे फलक; परभणी भाजप कामगार आघाडीचे आंदोलन

गणेश पांडे
Wednesday, 13 January 2021

औरंगाबादकडे जाणाऱ्या बसगाड्यावर औरंगाबाद नव्हे तर संभाजीनगर असे फलक चिटकवून गाड्या रवाणा करण्यात आल्या.

परभणी ः  औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करावे या मागणीसाठी मंगळवारी भाजप कामगार आघाडीच्यावतीने परभणीतील बसस्थानकात आंदोलन करण्यात आले. औरंगाबादकडे जाणाऱ्या बसगाड्यावर औरंगाबाद नव्हे तर संभाजीनगर असे फलक चिटकवून गाड्या रवाणा करण्यात आल्या.

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुपुत्र आणि स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांचेच नाव औरंगाबाद शहराला देण्यात यावे अशी आग्रही मागणी करीत भाजपा कामगार आघाडी परभणी महानगर तर्फे शहरातील बस स्टँड येथे जाऊन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस वर "औरंगाबाद नव्हे केवळ छत्रपती संभाजी नगर" अश्या आशयाचे फलक लावण्यात आले. औंरगाबाद शहराचे नामांतर करण्याचा मुद्दा सध्या राज्यभर गाजत आहे. राज्यात शिवसेनेची सत्ता असल्याने भाजपने हा मुद्दा जोमाले लावून धरला आहे. एकीकडे सत्तेत भागीदारी असलेल्या कॉग्रेसचा याला विरोध आहे. त्यामुळे भाजपने अधिक तीव्रतेने या मुद्यावर रान उठविले जात आहे.

हेही वाचा - एसटी बंदमुळे विद्यार्थी व ग्रामीण प्रवाशी अवैध वाहतुकीकडे; जीव मुठीत घेऊन प्रवास

भाजपच्या कामगार आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन

परभणीच्या बसस्थानकावर मंगळवारी (ता.12) दुपारी भाजपच्या कामगार आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी छत्रपती संभाजी महाराज की जय, भाजपा कामगार आघाडीचा विजय असो अश्या घोषणा ही दिल्या. यावेळी आंदोलनाचे नेतृत्व करणारे भाजप कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष रोहित जगदाळे म्हणाले, 'छत्रपतींचे राज्य म्हणजे समाजातील अत्यंत शेवटच्या घटकापर्यंत न्याय देणारे राज्य होते. परंतु, दुर्दैवाने या मराठी मुलखात परकीय औरंगजेबाच्या नावे औरंगाबाद हे शहर वसविले गेले. हा महाराष्ट्राच्या धरतीवर एक प्रकारचा डाग असून हे नाव तात्काळ काढले पाहिजे, अशी मागणी तमाम शिवभक्तांची आहे.'

येथे क्लिक करागावचा विकास करण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या- अब्दुल सत्तार

परिवहन महामंडळाच्या बसेस वर लावल्या गेले

भाजपा कामगार आघाडी तर्फे औरंगाबाद नव्हे केवळ संभाजीनगर" अश्या आशयाचे फलक राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस वर लावल्या गेले. भाजप सरचिटणीस दिनेश नरवाडकर, संजय रिझवाणी, भाजपा कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष रोहित जगदाळे, संतोष जाधव, कामगार आघाडी सरचिटणीस मनोज देशमुख, शुभम शास्त्री, अभिजित मंगरूळकर, निरज बुचाले, विठ्ल बेनशेळकीकर, सुनील ढसाळकर, गणेश कोपे, माऊली कोपरे, रोहन बागल आदी भाजपा कार्यकर्ते आणि पदाधकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादन- प्रल्हाद कांबळे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parbhani BJP workers' front agitation by putting up Sambhajinagar placards on buses parbhani news