परभणी : सीसीटीव्ही, पिंक बॉक्स लावा

निर्भया पथकाच्या शाळा, महाविद्यालयांना सूचना
Parbhani CCTV pink box
Parbhani CCTV pink box

परभणी : शहरासह जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालये पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहेत. त्यामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी निर्भया पथकही सज्ज झाले. शाळा-महाविद्यालयांना भेटी देऊन विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा आढावा घेतला जात आहे. त्याच बरोबर शाळा-महाविद्यालयांनी वर्गखोल्या, शालेय परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, तक्रारीसाठी पिंक बॉक्स ठेवावा, अशा सूचना दिल्या जात आहेत. त्यामुळे विद्यार्थिनीचा आत्मविश्वास बळावला असून, रोडरोमिओंचे धाबे दणाणले आहेत.

जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या. अनेक शाळा, महाविद्यालयाच्या बाहेर, रस्त्याने विद्यार्थिनी, महिलांची छेडखाणी करणारी टोळकी, रोडरोमिओदेखील सक्रिय झाल्याचे चित्र आहे. भरधाव वेगाने, कर्णकर्कश आवाज काढीत ही टोळकी, रोडरोमिओंनी उच्छाद घालण्यास सुरुवात केल्याचे दिसून येते. त्यामुळे रस्त्यावरून सायकल, दुचाकीसह पायी शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या मुलींना त्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागते. अनेक वेळ अपशब्द वापरणे, अश्लील बोलणे, धक्के मारण्याचे प्रकारही घडताना दिसून येतात. परंतु, आता या प्रकारांना चाप लागणार आहे. निर्भया पथके सक्रिय झाली आहेत. मुली-महिलांना त्रास होईल असे कृत्य करणाऱ्यांची आता काही खैर नाही.

पथकांच्या भेटी

जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथकाच्या पोलिस निरीक्षक श्रीमती गाडेकर यांच्या पुढाकाराने सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय शेळके, पोलिस नाईक करुणा मालसमिंदर, पोलिस कर्मचारी कृष्णा मुंढे, सचिन मोहिते यांचे पथक शाळा-महाविद्यालयांसह खासगी शिकवण्यांना भेट देऊन विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा आढावा घेत आहेत.

काही वेळा भीतीपोटी तर काही वेळा लज्जेमुळे छेडछाड करणाऱ्या विरुद्ध तक्रार देण्यास पुढे कोणी येत नाही. त्यामुळे शाळा, महाविद्यालये, खासगी कोचिंग क्लासेस चालकांनी त्या परिसरात तसेच पार्किंग किंवा जेथे विद्यार्थिनींचा मोठा वावर असतो, अशा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे व पिंक बॉक्स (तक्रार पेटी) बसवावेत. जेणेकरून विद्यार्थिनी स्वतःचे नाव गोपनीय ठेवून छेडछाड करणाऱ्याच्या नावासह तक्रार करू शकतील व पोलिसांना कारवाई करणे सोपे जाईल, अशा सूचनाही पथकाने केल्या.

शाळा, महाविद्यालयांची जबाबदारी

  • सीसीटीव्ही फुटेज आठवड्यातून दोन वेळेस शिक्षकांनी तपासावे

  • यातील तक्रारी निर्भया पथकास कळवाव्यात

  • गैरप्रकार आढळल्यास ७७४५८५६६६६ व ११२ क्रमांकावर कळवावे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com