परभणी : मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता

गणेश पांडे
Friday, 27 November 2020

कुठल्याही परिस्थितीत कापसाची फरदड (खोडवा) घेऊ नये. कापूस पीकाची शेवटची वेचणी पूर्ण झाल्यावर कापूस पिकाचा पालापाचोळा, पराटया  जमा करून त्यांची योग्य ते विल्हेवाट लावावी.

परभणी : प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील पाच दिवस आकाश स्वच्छ ते ढगाळ राहून ता. ३० नोव्हेंबर  रोजी मराठवाड्यातील बीड,लातूर, नांदेड आणि उस्मानाबाद जिल्हयात तुरळक ठिकाणी अतिशय हलक्या पाऊसाची शक्यता आहे. पुढील दोन दिवस मराठवाड्यात वाऱ्याचा वेग जास्त राहण्याची शक्यता आहे.

पीक व्‍यवस्‍थापन

कुठल्याही परिस्थितीत कापसाची फरदड (खोडवा) घेऊ नये. कापूस पीकाची शेवटची वेचणी पूर्ण झाल्यावर कापूस पिकाचा पालापाचोळा, पराटया  जमा करून त्यांची योग्य ते विल्हेवाट लावावी. रब्बी ज्वारी पीक वाढीच्या अवस्थेत असून उगवण झालेल्या रब्बी ज्वारी पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी थायामीथोक्झाम १२.६ % + ल्यामडा सायहालोथ्रीन ९.५ झेडसी ५ मिली किंवा स्पिनेटोरम ११.७ एससी ४ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तूर पीक फुले लागणे ते शेंगा वाढीच्या अवस्थेत असून तूर पीकात अळ्यांचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी क़्विनॉलफॉस २५ % २० मिली किंवा इमामेक्टीन  बेन्झोएट ५ % ४.४ ग्राम प्रती १० लिटर  पाण्यात मिसळून फवारणी करावी. पाण्याच्या उपलब्धतेनुसार  पाणी व्यवस्थापन करावे. गहू पीक पेरणी अवस्थेत असून उशीरा बागायती गहू पिकांची पेरणी १५ डिसेंबर पर्यंत करता येते. उशीरा बागायती गहू पिकांच्या पेरणीसाठी निफाड-३४, एचडी-२५०१, एचडी-२८३३ किंवा समाधान या वाणाची निवड करावी. उशीरा बागायती गहू पिकांच्या पेरणीसाठी ८०:४०:४० किलो नत्र, स्फुरद व पालाश खताची शिफारस आहे त्यापैकी पेरणी वेळी अर्धे नत्र व पूर्ण स्फुरद व पालाश खत मात्रा द्यावी.

हेही वाचा लोअर दुधनातून रब्बी पिकांना सुटणार पाणी- तेरा हजार हेक्टर जमिनीला मिळणार लाभ

फळबागेचे व्‍यवस्‍थापन

केळी पीक वाढीच्या अवस्थेत असून केळी बागेत सिगाटोगा रोगाच्या व्यवस्थापनासाठी प्रोपीकोनाझोल १० मिली + स्टिकर प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. केळी बागेत तणाचे नियंत्रण करावे. केळी बागेत झाडांना मातीचा आधार देऊन पाणी व्यवस्थापन करावे.द्राक्षे फुले लागणे अवस्थेत असून आवश्यकतेनुसार द्राक्षे बागेत पाणी व्यवस्थापन करावे. द्राक्षे बागेत जीए३ @ १० मिली ग्राम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्या ढगाळ वातावरण असल्यामुळे द्राक्षे बागेत रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्यांचे व्यवस्थापन करावे.  

फुलशेती व्‍यवस्‍थापन

पुनर्लागवड केलेल्या फुल पीकात तण व्यवस्थापन करून पाणी  व्यवस्थापन करावे.

भाजीपाला पिके

पुनर्लागवड केलेल्या भाजीपाला पीकात तण व्यवस्थापन करून पाणी व्यवस्थापन करावे. भाजीपाला पिकात पाणी व्यवस्थापन करत असताना पिकात पाणी साचणार नाही यांची काळजी घ्यावी.

तुती रेशीम उद्योग

वातावरणातील बदल, ढगळ हवामानात रेशीम कीटक संगोपनगृहातील तापमान २० अंश च्या खाली असेल तर कीटक तुती पाने खात नाहीत तसेच २५ ते २८ सें. मर्यादित ठेवण्यासाठी  संगोपनगृहात कोळसा शेगडी किंवा इलेक्ट्रीक रूम हिटरचा वापर करावा. तरच रेशीम कीटक तुती पाने खारतात व त्यांची चांगली वाढ होते. तापमान मर्यादित ठेवण्या बरोबर आद्रता ८०-८५ % ठेवण्यासाठी ह्युमिडी फायर चा वापर करावा म्हणजे चांगले कोषाचे उत्पादन वाढ होईल. 

 

संपादन-  प्रल्हाद कांबळे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parbhani: Chance of rain in some districts of Marathwada parbhani news