परभणी : केमिकलचा टँकर उलटून चालक गंभीर जखमी 

दिलीप मोरे.
Sunday, 15 November 2020

केमीकल बाहेर आल्याने वाहनचालकांमध्ये भिती, वाहतूक ठप्प; हेलस पाटीजवळील घटना 

देवगावफाटा ( जिल्हा परभणी ) : मुंबईहून हैद्राबादकडे केमिकल घेऊन जाणारा टँकर पलटी होऊन झालेल्या अपघातात टँकरचालक हा गंभीर जखमी झाला तर झालेल्या अपघातात टँकरमधील केमीकल बाहेर आल्याने वाहनचालकांमध्ये भीती निर्माण होऊन महामार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. ही घटना औरंगाबाद- नांदेड महामार्गावरील हेलस पाटी येथुन जवळच असलेल्या बालाजी काॅट जिनिंग जवळ रविवारी ( ता १५ ) दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली.

हेही वाचा -  पालकमंत्र्यांना वेळ मिळेना..धरणे शंभर टक्के भरली, पण नियोजनचा अभाव, ऊस व रब्बीच्या पेरण्या लांबल्या. -

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मुंबई येथून केमीकल भरून एमएच -२० इएल -३७३० क्रमांकाचा टँकर हैद्राबादकडे जात होता. दरम्यान हा टँकर हेलस पाटी येथुन जवळच असलेल्या बालाजी काॅट जिनिंगसमोरील वळणावर आला असता चालकाचा आपल्या वाहनावरील ताबा सुटून केमीकलने भरलेला टँकर रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाला. यात त्र्यंबक तातेराव वाहुळे  ( वय ४० ) हा चालक गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर टँकर मधील केमिकलच्या गळतीमुळे नागरिकांसह वाहनचालकांमध्ये चांगलेच भीतीचे वातावरण पसरले होते. सदरील घटनेचे माहीती मिळाल्यानंतर मंठा पोलीसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन टँकरमध्ये अडकलेल्या त्र्यंबक वाहुळे या जखमी चालकाला बाहेर काढले व मंठा जि जालना येथील शासकीय रुग्णालयात दाखल करून महामार्गावर झालेली वाहतूक कोंडी सुरळीत केली.

संपादन- प्रल्हाद कांबळे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parbhani: Chemical tanker overturned and driver seriously injured parbhani news