VidhanSabha 2019 : युतीत दावे-प्रतिदावे, ‘वंचित’चाही प्रभाव

VidhanSabha 2019 : युतीत दावे-प्रतिदावे, ‘वंचित’चाही प्रभाव

विधानसभा 2019
परभणी जिल्ह्यात विधानसभेचे चार मतदारसंघ आहेत. त्यातील जागावाटपाबाबत काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडीत फारशी क्‍लिष्टता नाही. परंतु शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीत मात्र काही जागांवरून वाद निर्माण होण्याची शक्‍यता आहे. युतीतील इच्छुक आतापासूनच दावे प्रतिदावे करू लागले आहेत. निवडणुकीवर वंचित बहुजन आघाडीचादेखील प्रभाव राहणार असून, जर त्यांना तगडा उमेदवार मिळाला तर एखादी जागादेखील त्यांच्या पदरात पडू शकते, अशी सध्याची परिस्थिती आहे.

परभणी विधानसभा मतदारसंघ हा युतीत शिवसेनेकडे, तर आघाडीत काँग्रेसकडे आहे. या मतदारसंघावर मागील २५-३० वर्षांपासून शिवसेनेचा कब्जा असून, शिवसेनेचे आमदार डॉ. राहुल पाटील यांची बाजू भक्कम आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी आणि भाजपचे महानगराध्यक्ष आनंद भरोसे यांनी ही जागा सोडवून घेण्यासाठी प्रयत्न केले होते. परंतु असा बदल होण्याची शक्‍यता कमी आहे. आघाडीत ही जागा काँग्रेसकडे असून, इच्छुकांची मोठी यादी आहे. माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, माजी आमदार सुरेश देशमुख, उपमहापौर भगवान वाघमारे, रविराज देशमुख, सुरेश नागरे, उपमहापौर सय्यद समी ऊर्फ माजुलाला यांची नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत. 

वंचित बहुजन आघाडीने शहरात मोठा प्रभाव निर्माण केलाय. लोकसभा निवडणुकीत बहुतांश बौद्ध-दलित समाजाची मते वंचितकडे तर मुस्लिम समाजाची मते राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘वंचित’ने दोन्ही समाजाची मते घेणारा उमेदवार निवडला तर शिवसेना-काँग्रेससाठी ते मोठे आव्हान ठरेल. ‘वंचित’कडून लोकसभेचे उमेदवार आलमगीर खान यांचे नाव पुढे येत असले तरी ऐनवेळी एखादे नवे नाव समोर येण्याची शक्‍यता अधिक आहे. अन्य काही पक्षातील मातब्बर उमेदवारांनीदेखील तिकिटासाठी फिल्डिंग लावली आहे. भाजपमधूनदेखील बंडखोरीची शक्‍यता नाकारता येत नाही.

जिंतूर मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे आघाडीचे उमेदवार निश्‍चित आहेत. युतीत ही जागा शिवसेनेकडे असून, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकरांसाठी ती भाजपकडे जाण्याची अधिक शक्‍यता आहे. तेव्हा मात्र, शिवसेनेबरोबरच भाजपमधील इच्छुकांची कोंडी होणार आहे. भाजपकडे ही जागा आल्यास शिवसेनेचे राम पाटील यांची भूमिका लक्षवेधी ठरणार आहे. विधानसभा निवडणुकीत प्रस्थापितांची वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांवर करडी नजर असणार आहे. 

जिंतूर मतदारसंघात आमदार भांबळे आणि माजी आमदार बोर्डीकर यांच्यातील लढत लक्षवेधी ठरणार आहे. बोर्डीकर उमेदवार राहिल्यास जाधव यांची त्यांना भक्कम साथ मिळणार, हे निश्‍चित. तसेच आमदार भांबळे यांच्यावर पक्षांतर्गत नाराजीचे सूरदेखील उमटत आहेत.

गंगाखेड विधानसभा मतदारसंघ सध्या ‘राष्ट्रवादी’चे आमदार डॉ. मधुसुदन केंद्रे यांच्या ताब्यात असून, या मतदारसंघात युती, आघाडीसह इच्छुक अपक्षांची संख्यादेखील मोठी आहे. युतीत हा मतदारसंघ राष्ट्रीय समाज पक्षाकडे असून, सद्यस्थितीत या पक्षाचे संभाव्य उमेदवार रत्नाकर गुट्टे हे संकटात आहेत. भाजपच्या काही इच्छुकांनीदेखील येथे दावा केला आहे. वंचितकडूनदेखील काही इच्छुक प्रयत्नात आहेत. मित्र मंडळाच्या माध्यमातून संतोष मुरकुटे हे मतदारसंघात जाळे विणत असून, माजी आमदार सीताराम घनदाट यांचेदेखील पाच वर्षांच्या विश्रांतीनंतर मैदानात उतरण्याचे संकेत आहेत. विद्यमान जिल्हा परिषद सदस्या करूणा कुंडगीर, गोविंद यादव हेदेखील तयारीला लागले आहेत. माजी खासदार सुरेश जाधव यांची देखील लढण्याची इच्छा आहे.

पाथरी मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीत मोहन फड यांनी अपक्ष निवडून येत प्रस्थापितांना धक्का दिला होता. पाच वर्षांत बरीच राजकीय समीकरणे बदललीत. अपक्ष आमदार फड यांचा ‘व्हाया’ शिवसेना भाजप असा प्रवास झाला असून, ते भाजपचे सहयोगी सदस्य आहेत. परंतु हा मतदारसंघ युतीमध्ये शिवसेनेकडे असून, हीच त्यांची मोठी अडचण आहे. हा मतदारसंघ सोडवून घेण्यात ते कितपत यशस्वी होतात, हे आगामी काळात दिसेल. भाजपला  मतदारसंघ मिळाला नाही, तर पुन्हा एकदा ते अपक्ष म्हणून शड्डू ठोकू शकतात. 

खासदार संजय जाधव यांनी शिवसेनेकडून मात्तब्बर उमेदवार पुढे करण्यास सुरवात केली आहे. आघाडीत हा मतदारसंघ काँग्रेसकडे असून, माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांचे नाव निश्‍चित आहे. आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्याशी संबंध सलोख्याचे आहेत. ‘वंचित’ला लोकसभेत चांगली मते मिळाल्याने त्यांच्याकडून कोणता उमेदवार दिला जातो, हेही महत्त्वाचे आहे. सुनील बावळे पाटील ‘वंचित’कडून लढण्यास इच्छुक आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com