Parbhani : गाव पुढारी, उमेदवारांच्या प्रचाराने जोर धरला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 grampanchayat election update

Parbhani : गाव पुढारी, उमेदवारांच्या प्रचाराने जोर धरला

परभणी : निवडणूक जितकी लहान तितकी ती चुरशीची, अटीतटीची होण्याची शक्यता अधिक असते. जिल्ह्यात १२७ ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली. आठ ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध झाल्यामुळे गुलाल उधळला गेला. परंतु, उर्वरित गावाच्या निवडणुकीत मतदारापर्यंत पोचण्यासाठी गाव पुढाऱ्यांसह विविध राजकीय पक्षांची नेतेमंडळी, लोकप्रतिनिधी कामाला लागले आहेत. मतदारांच्या भेटी-गाठीसाठी पहाटे सकाळीच तसेच रात्री उशिरासाठी उमेदवार गावात फिरत असून, सहली देवदर्शनाचा लाभही काही मतदारांना मिळू लागला आहे.

परभणी जिल्ह्यातील १२७ ग्रामपंचायत निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली. ता. सात डिसेंबरच्या माघारीनंतर चित्र स्पष्ट झाले आहे. पक्षीय निवडणुका नसल्यातरी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, दोनही शिवसेना, भारतीय जनता पक्षासह छोट्या मोठ्या पक्षाचे नेतेमंडळीही आपल्या समर्थक पॅनॉल, उमेदवारांना पाठबळ देण्यासाठी सक्रिय झाले आहेत.

आठ ग्रामपंचायती बिनविरोध

जिल्ह्यातील १२७ पैकी आठ ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. काही ठिकाणी एकोपा राहावा, वाद निर्माण होऊ नये म्हणून ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन या निवडणुका बिनविरोध घडवून आणल्या तर काही ठिकाणी पुढारी मंडळीच्या पुढाकाराने हे शक्य झाले आहे. त्यामुळे आता ११९ गावच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा धुराळा उडाला आहे. जिल्ह्यात त्या-त्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी, नेतेमंडळी, गावपुढारी यांनी आपल्या मतदार संघातील निवडणुका बिनविरोध व्हाव्यात म्हणून प्रयत्न केले.

परंतु, त्यास फारशे यश आल्याचे दिसून येत नाही. परभणी, तालुक्यातील साटला, इठलापूर देशमुख, जिंतूर तालुक्यातील डिग्रस, पाथरी तालुक्यातील गोपेगाव, पूर्णा तालुक्यातील मुंबर, गोविंदपूर, गंगाखेड तालुक्यातील भांबरवाडी व मानवत तालुक्यातील सोनुळा या गावात मात्र सरपंचांसह सदस्यांच्या अंगावर गुलालाची उधळण झाली आहे.

सरपंचपदासाठी ३१३ उमेदवार

जिल्ह्यात ११९ ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सरपंचपरदासाठी ३१३ उमेदवार व तर सदस्यपदासाठी दोन हजारावर उमेदवार रिंगणात आहेत. एकूण १२७ सरपंच व एक हजार ९१ सदस्यपदासाठी ही निवडणूक होणार होती. परंतु, काही ग्रामपंचायत, काही सरपंचपदे तर काही ठिकाणी सदस्यपदे बिनविरोध झाली आहेत.

भावकी, नात्यागोत्याचे राजकारण जोरात

जिल्ह्यात ग्रामपंचायतीसाठी ता. १८ डिसेंबरला मतदान होणार आहे तर ता. २० डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. उमेदवारांना आता प्रचारासाठी सात ते आठ दिवस शिल्लक असून, त्यांनी मतदारांच्या गाठीभेटीवर भर दिल्याचे चित्र आहे. त्यातच भावकी, नात्यागोत्याच्या

राजकारणानेदेखील जोर धरला. त्यांच्यासह समर्थकांच्या माध्यमातून मतदारांना खेचण्याचे प्रयत्न होऊ लागले आहेत. काही गावात भावकीतही वाद असून, त्यामुळे तेथील चुरस शिगेला पोचली आहे. थेट सरपंच निवडून दिले जाणार असल्यामुळे या पदाचे अनेक उमेदवार गावातील प्रमुख मतदारांना सहल, देवदर्शनाच्या माध्यमातून प्रभावित करण्याचा देखील प्रयत्न करीत आहेत. काही उमेदवारांनी ओल्या पार्ट्यासुद्धा सुरू केल्याची माहिती आहेत. रस्त्यावरील धाबे, हॉटेल्स, शेतशिवार रात्रीच्या वेळी गजबजून जात आहेत.

मर्यादेपेक्षा अधिक खर्च

निवडणुकीत किती खर्च करावा? याबाबत निवडणूक आयोगाने मर्यादा घालून दिली आहे. सात सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीची निवडणूक लढवणाऱ्यांना २५ हजार रुपये, ९ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीसाठी ३५ हजार, ११ सदस्यीय ग्राम पंचायतीसाठी ४५ हजार आणि १३ सदस्यीयमधील उमेदवारांना ७५ हजार रुपयांपर्यंत खर्च करता येईल. पण, या खर्चाचा हिशेब द्यावा लागेल. अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल. असा नियम आहे. पण, अनेक जण मर्यादेपेक्षा अधिक खर्च करून सरकारच्या डोळ्यांत धूळफेक करीत आहेत.