परभणी ‘जिप’चे अध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

पाथरी, जिंतुर मतदार संघात चढाओढ, माजी आमदार विजय भांबळे यांच्या भुमीकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.महाशिवआघाडी झाल्यास शिवसेनेच्यावतीने वसंधुराबाई घुंबरे यांचे नाव पुढे

परभणी : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची आरक्षण खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी सुटले आहे. मंगळवारी (ता.१९) आरक्षण सोडत जाहीर झाल्याने पुढील अडिच वर्षासाठी नवे पदाधिकारी निवडले जाणार आहेत. दरम्यान, अध्यक्षपदासाठी पाथरी आणि जिंतुर मतदार संघात स्पर्धा लागलेली आहे.

जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ ता.२१ सप्टेंबर रोजी मुदत संपल्यानंतर  विधानसभा निवडणुकीमुळे चार महिण्यांची मुदत मिळाली होती. आता मुदतवाढ देखील संपत आल्याने ग्रामविकास विभागाने नवे पदाधिकारी निवडण्याची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी मंगळवारी (ता.१९) राज्यातील ३४ जिल्हा परिषद अध्यक्षांच्या आरक्षणाची सोडत जाहीर केली. त्यामध्ये परभणीचे अध्यक्षपद हे आपेक्षेप्रमाणे खुल्या प्रवर्गातील महिलेला राखीव झाले आहे. त्यामुळे आता निवडीकडे लक्ष लागले आहे. सध्या जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपच्या मदतीने सत्ता आहे. पाठींब्याच्या बदल्यात भाजपला एक सभापतीपद देण्यात आले आहे. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे २४, शिवसेनेचे १३, काँग्रेसचे सहा भाजपचे पाच, रासपचे तीन व अपक्ष तीन सदस्य आहेत.आता राष्ट्रवादीकडून पाथरी आणि जिंतुर मतदार संघात स्पर्धा आहे. 

भांबळेंच्या भुमिकेकडे लक्ष

जिंतुर आणि सेलु तालुक्यात राष्ट्रवादीचे सर्वाधीक १३ सदस्य आहेत. त्यामुळे माजी आमदार विजय भांबळे यांच्या भुमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर काही दिवसांपासून अध्यक्षपदाच्या प्रबळ दावेदार म्हणून चर्चेला असलेल्या जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर यांच्या मातोश्री निर्मलाबाई विटेकर यांचेही नाव आघाडीवर आहे. आता या स्पर्धेत आणखी काही नावे समोर येत आहेत.  जिंतुर तालुक्यातून शालीनीताई दुधगावकर, सेलु तालुक्यातून इंद्रायणी रोडगे या स्पर्धेत आहेत. तर पाथरी तालुक्यातून विद्यमान उपाध्यक्षा भावनाताई नखाते यांनीही दावा करण्यास सुरुवात केली आहे. नखाते यांनी शिक्षण आणि आरोग्य सभापतीच्या कार्यकाळात केलेल्या विकासकामाच्या बळावर दावेदारी सांगीतली आहे. तर महाशिवआघाडी झाल्यास शिवसेनेच्यावतीने वसंधुराबाई घुंबरे यांचे नाव पुढे येऊ शकते.

कसे राहील गणित 

सत्तेसाठी २८ सदस्यांची आवश्यकता आहे. राष्ट्रवादीकडे २४ सदस्य आहेत. त्यांनी कॉंग्रेसशी आघाडी केल्यास कॉंग्रेसचे सह सदस्य मिळुन ३० संख्याबळ होत आहे. त्यामुळे अन्य कुणाला सोबत घेण्याची गरज नसेल. परंतु मागील अडीच वर्षापासून रासप आणि अपक्ष असे सहा सदस्य राष्ट्रवादीसोबत आहेत. त्यामुळे त्यांनाही सोबतच घेण्याची दाट शक्यता आहे. यदाकदाचीत राज्यस्तरावर महाशिवआघाडीचा आदेश आल्यास शिवसेनेचे १३ सदस्य मिळुन ४९ जणांचे संख्याबळ होईल. भाजपलासोबत घेण्यावर सध्यातरी राष्ट्रवादीकडून कोणीही बोलायला तयार नसल्याने त्यांना सत्तेबाहेर ठेवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यांच्याही भुमिका महत्वाच्या
अध्यक्षपदाच्या निवडीत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी व कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश वरपुडकर,जिंतुरचे माजी आमदार विजय भांबळे  यांच्या भुमिका महत्वाच्या आणि अंतिम राहणार हे स्पष्ट आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parbhani 'Jeep' chaired by an open-class woman