
Parbhani : जिंतूर-जालना राज्यमार्गावरील मालेगाव, रायखेडा येथे खड्डे
जिंतूर : राज्य महामार्गाचे काम अत्यंत निकृष्ट झाल्याचा आरोप परिसरातील ग्रामस्थ करीत आहेत. या रस्ता कामात काळ्या मातीचा भरणा केला. त्यामुळे जागोजागी खड्डे पडले आहेत. यामध्ये रायखेडा गावाजवळ व मालेगाव शिवारातील अनेक लहानमोठे अनेक खड्डे धोकादायक बनले आहेत. परिणामी, अपघाताचे प्रमाण वाढत आहे. याकडे राज्य महामार्ग विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने प्रवासी जनता व वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे.
जिंतूर-जालना राज्य महामार्ग असल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, आंध्रप्रदेश या भागात ये-जा करणाऱ्या वाहनांची या मार्गावर सतत वर्दळ असते. परंतु, रस्त्यावर जागोजागी लांबरुंद अगणित खड्डे पडले. त्यामुळे अपघाताच्या लहानमोठ्या घटना घडण्याचे प्रकार नित्याचे झाले आहे. यात अनेकांना जीव गमवावा लागला. मालवाहतूक करणाऱ्या वाहनांचे टायर फुटणे, मोडतोड होणे नित्याचेच झाले होते. यामुळे वाहनधारकांसह सर्वसामान्य नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आहे.
रस्ता दुरुस्तीचे काम लवकर करण्याच्या मागणीसाठी तालुक्यातील सामाजिक संघटनांनी आंदोलन करून प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, राज्य महामार्ग विभाग (जालना) कार्यालयाने रस्त्याच्या कामासाठी तब्बल १६ कोटी रुपयांचा निधी डांबरीकरणासाठी मंजूर केला. खासदार आमदारांच्या हस्ते कामाचा प्रारंभ थाटात करण्यात आला. परंतु, संबंधित कंत्राटदाराने अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम सुरू केले होते.
यात रस्त्याच्या साइड भरणात चांगल्या दर्जाचे मुरूम मेटल वापरणे गरजेचे होते. मात्र, जबाबदार अधिकारी, कर्मचारी यांनी कामाकडे ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष केल्याने कंत्राटदाराने कामाचा सुमार दर्जा राखत चक्क काळ्या मातीचा भरणा करून डांबर अल्प प्रमाणात वापरून अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केले. परिणामी, जागोजागी रस्ता खचला असून, खड्डे पडत असल्यामुळे बोगस कामाचे पितळ उघडे पडले आहे.
चौकशीची मागणी
या कामात शासनाला कोट्यवधी रुपयांना चुना लागला आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन कामाची सखोल चौकशी करून रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांसह वाहनधारक करत आहेत.