शिवसेनेची भूमिका दुटप्पी - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 जून 2017

परभणी - सत्तेत बसूनही सातत्याने सत्ताविरोधी भूमिका घेऊन शिवसेना दुटप्पी राजकारण करीत आहे. शिवसेनेने एका भूमिकेवर ठाम राहावे, असा सल्ला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी परभणीत दिला.

परभणी - सत्तेत बसूनही सातत्याने सत्ताविरोधी भूमिका घेऊन शिवसेना दुटप्पी राजकारण करीत आहे. शिवसेनेने एका भूमिकेवर ठाम राहावे, असा सल्ला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी परभणीत दिला.

परभणी जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदींच्या उपस्थितीत परभणीत आज सकाळी कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. त्यानंतर दुपारी पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. 'शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावर शिवसेना प्रत्येक वेळी वेगवेगळी भूमिका घेत आहे. कधी राजीनामा देण्याची, तर कधी सत्तेतून बाहेर पडण्याची धमकी दिली जाते. शिवसेनेच्या मंत्र्यांनी राजीनाम्याची धमकी दिली होती. त्यांचे राजीनामे खिशातच राहिले. आता ते चुरगळून गेले, काहींचे तुकडेही पडले तरी त्यांचे राजीनामे खिशाच्या बाहेर येत नाहीत, '' अशी खिल्लीही त्यांनी उडविली.

सध्या सत्तेतील पक्षांना राज्यात विकासकामे करण्याची सुवर्णसंधी आहे. चांगले बहुमत आहे; परंतु या वातावरणाचा सत्ताधाऱ्यांना फायदा उचलता येत नाही. त्यामुळे राज्यात अस्वस्थ वातावरण असल्याचे ते म्हणाले. तटकरे म्हणाले, की राज्य सरकारने केलेली कर्जमाफी ही शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी आहे. सरसकट कर्जमाफीचे शेतकऱ्यांना गाजर दाखविले जात आहे. या कर्जमाफीमध्ये जाचक निकष लावण्यात आले आहेत. या वेळी माजी मंत्री प्रकाश सोळंके, जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार मधुसूदन केंद्रे, आमदार रामराव वडकुते, माजी खासदार गणेशराव दुधगावकर आदी उपस्थिती होते.

'राष्ट्रवादी' पूर्ण ताकदीने समोर येईल
पक्ष संघटनेसंदर्भात बोलताना पवार म्हणाले, 'पक्षातील अतंर्गत माहिती कुणीही बाहेर देऊ नये यासाठी सर्व कार्यकर्त्यांना पक्षाने आदेश दिला आहे. पक्षातील सर्व पदे लवकरच भरली जातील. सध्या पक्षपातळीवर महिला संघटन चांगले आहे. युवकांची फळीदेखील मजबूत होत आहे. त्यामुळे आगामी काळात पक्ष पूर्ण ताकदीने समोर येईल.'

Web Title: parbhani marathwada news shivsena role is confussion