परभणी महापालिका होणार मालामाल !

file photo
file photo

परभणी : महापालिकेने कोट्यवधींचा चालू व थकीत मालमत्ता कर ऑनलाइन पद्धतीने वसूल करण्याची कार्यवाही गतिमान केली असून सोमवारी (ता. २७) आयुक्त रमेश पवार यांच्या दालनात कर्मचाऱ्यांनी सादर केलेले प्रात्यक्षिक यशस्वी ठरले. लवकरच या अॅपचा शुभारंभ केला जाणार असल्याची माहिती श्री. पवार यांनी दिली.
महापालिकेच्या मालमत्ता कराराची वसुली फेर सर्वेक्षणानंतर फारशी झालेली नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुका व अन्य निवडणुकींच्या कामात पालिकेचे वसुली अधिकारी व्यस्त असल्याचा वसुलीवर मोठा परिणाम झाला होता. त्याच दरम्यान, स्थायी समितीचे सभापती सुनील देशमुख हे कर वसुली प्रक्रिया ऑनलाइन करण्यासाठी आग्रही होते. त्यांनी तत्कालीन व विद्यमान पदाधिकाऱ्यांची संमती मिळवून या प्रक्रियेला गती दिली होती. त्यासाठी अमरावती येथील एका एजन्सीची नियुक्त केली. प्रत्येक वार्डसाठी एक बिल कलेक्टर
गतवर्षी या एजन्सीने विकसित केलेल्या सॉफ्टवेअरमध्ये मालमत्तांची माहिती भरण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू होते. आता ते पूर्ण झाले आहे. त्यासाठी शहराचे ३५ वार्ड करण्यात आले असून प्रत्येक वार्डसाठी एक बिल कलेक्टर देण्यात आलेले आहेत. त्या प्रत्येकास ऑनलाइन कराचा भरणा करण्यासाठी प्रत्येकी एक मोबाईल टॅब व ब्ल्यू टुथ प्रिंटरदेखील देण्यात आलेले आहे. ३५ पैकी २१ वार्डात मालमत्ता कराच्या ऑनलाइन प्रिंट काढलेल्या डिमांड नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. तर उर्वरित वार्डात त्या देण्याचे कामदेखील युद्ध पातळीवर सुरू आहे. त्याच बरोबर प्रायोगीत तत्वावर ऑनलाइन कर वसुलीदेखील सुरू झालेली आहे. सोमवारी (ता. २७) आयुक्त रमेश पवार यांच्या दालनात महापालिकेच्या संगणक विभागाने प्रात्यक्षिकाचे सादरीकरण केले. या वेळी स्थायी समितीचे सभारती सुनील देशमुख, नगरसेवक बालासाहेब बुलबुले, उपायुक्त गणपत जाधव यांची उपस्थिती होती. ऑनलाइन कर भरणा कशा पद्धतीने व कोणकोणत्या माध्यमातून केला जातो, त्यांच्या नोंदी कुठे-कुठे होतात, भरणा केल्याची पावती कशी दिली जाते, याची माहिती संगणक विभागाचे अदनान कादरी , मालमत्ता कर अधीक्षक अल्केश देशमुख, वसुली अधिकारी श्री. शिंदे यांनी दिली.

हेही वाचा -  पालकमंत्र्यांचे आश्वासन मिळाले अन् आंदोलन मागे ​


मुख्यालयासह प्रभाग समित्यांमध्ये कर भरणा केंद्र
सद्यःस्थितीत मालमत्ता कराचा व नंतर पाणी कराचा भरणा करण्यासाठी महापालिकेच्या मुख्य इमारतीसह तीनही प्रभाग समित्यांमध्ये करभरणा केंद्र सुरू केले जाणार आहेत. तसेच वार्ड बिल कलेक्टरकडे व ऑनलाइन पद्धतीनेदेखील घरबसल्या नागरिकांना कराचा भरणा करता येणार आहे. रोख, धनादेश, धनाकर्ष, ऑनलाइन अशा सर्वच पद्धतीने नागरिक आपला कर भरू शकतता. कर भरल्यानंतर लगेचच त्यांच्या मोबाईलवर कर भरल्याचा मेसेजदेखील येणार असून सर्व जोडलेल्या संगणकांमध्ये त्याची नोंद होणार आहे. कर अधीक्षक, आयुक्त यांच्या दालनातील संगणकावर दररोजच्या नोंदीदेखील समजणार असून कुठल्या बिल कलेक्टरने किती कर भरला, कोणत्या वार्डात किती कर भरला व किती बाकी आहे, याचीदेखील अद्यावत माहिती मिळणार आहे.

शास्तीसह कर वसुली झाल्यास आकडा ७७ कोटींवर
परभणी शहरातील मालमत्तांची संख्या आता ७१ हजार २८७ झालेली असून सर्व नोंदीनंतर ती वाढण्याची शक्यता आहे. महापालिकेची चालू वर्षाची मागणी २३ कोटी ५० लक्ष आहे. तर थकबाकी ४२ कोटी आहे. असे महापालिकेला ६५ कोटी ९७ लाख रुपये फक्त मालमत्ता कर येणे बाकी आहे. या थकीत करावर शास्ती आकारल्यास ती रक्कमदेखील १३ कोटी पेक्षा अधिक होते. शास्तीसह कर वसुली झाल्यास हा आकडा ७७ कोटींवर पोचणार असून पारदर्शक ठरणाऱ्या ऑनलाइन प्रक्रियेच्या वापरामुळे मोठ्या प्रमाणात कर वसुली होऊन महापालिका मालामाल होणार असल्याचे बोलले जात आहे. पालिकेची पाणीपट्टीदेखील मोठ्या प्रमाणावर थकीत आहे. आता नवीन नळजोडणी देताना हा थकीत करदेखील वसूल केला जाणार असल्याची शक्यता असून ही रक्कमदेखील कोट्यवधींच्या घरात जाणार आहे. त्यामुळे येत्या चार-सहा महिन्यांत पालिकेला १०० कोटी पेक्षा अधिक कर वसूल होणार असल्याचे बोलले जात आहे. तो निधी सत्कारणी लागावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

नागरिकांनी सहकार्य करावे
करवसुलीची ऑनलाइन पद्धत पारदर्शक व विश्वासार्ह आहे. तसेच नागरिकांच्या ती सोयीचीदेखील आहे. लवकरच या अॅपचा उद्‍घाटन सोहळा व करवसुली प्रक्रियेला सुरवात होणार आहे. आमदार सुरेश वरपुडकर यांच्यासह सर्व पदाधिकारी, सदस्यांच्या सहकार्याने ऑनलाइन कर वसुली प्रक्रिया सुरू करण्यात यश मिळाले आहे. काही दिवसांनंतर नागरिकांच्या सोयीसाठी विविध बॅंकांतदेखील करभरणा सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. नागरिकांनी विहीत मुदतीत कराचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त रमेश पवार, स्थायी समितीचे सभापती सुनील देशमुख यांनी केले आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com