Parbhani News : पाण्याचा दुष्काळ संपला पण वाटपाचे हवे नियोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Parbhani News

Parbhani News : पाण्याचा दुष्काळ संपला पण वाटपाचे हवे नियोजन

परभणी : महापालिकेच्यावतीने १६ जलकुंभांतून ५२ दलघमी पाण्याचा पुरवठा केला जात आहे. काही भागात दररोज, काही भागात एक दिवसाआड तर काही भागात दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. शहराला सद्यस्थितीत मुबलक पाण्याचा पुरवठा होत आहे. परंतु, वेळांचे नियोजन मात्र करणे आवश्यक आहे.

महापालिकेच्या ‘युआयडीएसएसएमटी’ व अमृत या योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झालेल्या आहेत. तसेच राहटी व धर्मापुरी या दोन्ही ठिकाणच्या जलशुध्दीकरण केंद्रावरुन शहराला नियमित पाणी पुरवठा केला जात असून परभणीकरांची पाण्यासाठी होणाऱ्या भटकंती व पाणी टंचाई कायमची दूर झाल्याचे चित्र आहे.

४७५ किलोमीटरची वितरण व्यवस्था

शहरात युआयडीएसएसएमटी व अमृत योजनेतून ४७५ किलोमिटर अंतराची अंतर्गत पाईपलाईन अंथरण्यात आली असून शहराचा ५० ते १०० किलोमिटरची पाईपलाईन वगळता सर्वत्र नवीन पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. शहराच्या गावठाण भागातील काही गल्ल्या, काही मोहल्ले वगळता सर्वत्र नवीन पाईपलाईन पाणी पुरवठा केला जात आहे. येत्या पंधरा दिवसात जुनी सर्व लाईन बंद करुन नवीन पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा केला जाणार आहे. शहराला दररोज ५२ दलघमी पाणी पुरवठा केला जात असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे अभियंता मिर्झा तनवीर बेग यांनी दिली. जिंतूर रोड ते दत्तधाम या रस्त्याच्या उजव्या भागातील वसाहती, दत्तधाम ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या रस्त्यावरील उजव्या भागातील वसाहती, धाररोड आदी सर्व भागात नवीन पाईपलाईनने पाणी पुरवठा केला जात असल्याचेही श्री. बेग म्हणाले.

भूमिगत गटारची प्रतिक्षा कायम

राज्य शासनाने महापालिकेच्या भूमिगत गटार योजनेसह समांतर पाणी पुरवठा योजनेला मंजुरी दिली आहे. भूमिगत गटार योजना ३६३ कोटी तर समातंर पाणी पुरवठा योजना १५० कोटींची आहे. महापालिकेने त्यासाठी प्रस्तावदेखील शासनाला पाठवलेले आहेत. दरपत्रकात बदल झाल्यामुळे भूमिगतचा प्रस्ताव नव्याने पाठवला जाणार असल्याची माहिती श्री. बेग यांनी दिली. त्यामुळे पालिका व नागरीकांना या योजनेची अजुन प्रतिक्षा करावी लागणार आहे.

पाण्याच्या वेळांचे नियोजन गरजेचे

महापालिकेकडून शहराला पाणी पुरवठा केला जातो. परंतु, कोणत्या भागात कधी व कोणत्या वेळेला पाणी सोडल्या जाईल, यासाठीच्या नियोजनाचा मात्र अभाव असल्याचे दिसून येते. त्यामुळे दररोज पाणी पुरवठा होणारे भाग वगळता अन्य भागातील नागरीकांना पाण्याची प्रतिक्षा करावी लागते. तसेच पाणी सोडण्याच्या वेळा खील निश्चित नाहीत. एकाच भागात कधी सकाळी, कधी दुपारी तर कधी सायंकाळी पाणी सोडल्या जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पालिकेने प्रत्येक जलकुंभावर वेळ व वाराचे नियोजन लावणे अथवा सोशल मिडीयाच्या माध्यमातून जनजागृती करणे गरचेचे आहे.