आई,बाबा मला क्षमा करा: कर्जाच्या विवंचनेपोटी २३ वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

आई बाबा मी तुमचा सांभाळ करणे माझी जबाबदारी आहे. ते मी आता पूर्ण करु शकत नाही. मला माफ करा. ताई, मी राखीपोर्णिमेला नसणार. मला क्षमा कर

पूर्णा - "ताई, आई, बाबा मला माफ करा,' अशी हताश विनवणी करून तालुक्यातील बरबडी येथील अनिल रमेश शिंदे या तेवीस वर्षीय युवा शेतकऱ्याने जीवनयात्रा संपविली आहे.
मागील तीन वर्षापासूनच्या दुष्काळामुळे व यावर्षीही पाऊस पडत नसल्याने आता कर्ज कसे फेडावे या विवंचनेतुन अनिल याने गळफास घेउन आत्महत्या केली. त्याच्यावर जिल्हा मध्यवर्ती बैंक व बैंक ऑफ हैद्राबाद या दोन्ही बैंकांचे मिळून एक लक्ष साठ हजार रुपये कर्ज आहे. यावर्षीही पाऊस न पडल्याने सुगी गेल्यात जमा आहे. त्यामुळे तो तणावात होता.

कर्ज कसे फेडावे या तणावातच तो रविवारी रात्री शेतात गेला तो परतलाच नाही. त्याने शेतातील लिंबाच्या झाडाला रात्रीतून गळफास घेउन आत्महत्या केली, अशी माहिती त्याच्या काकांनी दिली. अनिल याने आत्महत्या करण्यापूर्वी त्याने लिहून ठेवलेली चिठ्ठी त्याच्या खिशात आढळून आली. त्यात त्याने ,"आई बाबा मी तुमचा सांभाळ करणे माझी जबाबदारी आहे. ते मी आता पूर्ण करु शकत नाही. मला माफ करा. ताई, मी राखीपोर्णिमेला नसणार. मला क्षमा कर, तुझा राखी बांधण्याचा हक्क होता. तो मी घेउन जात आहे,' असे नमुद केले आहे.

ऐन राखीपोर्णीमेच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे बरबडी गावावर शोककळा पसरली असून गावकऱ्यांनी तरुण शेतकऱ्याच्या निधनामुळे सणही साजरा केला नाही.माजी सरपंच रमेश शिंदे यांचा अनिल हा मुलगा होता.या घटनेमुळे तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.पोलीस निरीक्षक सुनील ओव्हळ यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अनिल लांडगे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: parbhani news: farmer suicide