परभणी जिल्ह्यात खाजगी सावकाराविरुद्ध कारवाई

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 जून 2017

तालुक्‍यात बेकायदेशीरित्या सावकारी करणाऱ्या सावकाराच्या नावे असलेले खरेदी खत रद्द करून जमीन मूळ मालकाच्या नावे करण्याचा ऐतिहासिक निर्णय जिल्हा निबंधक गणेश पुरी यांनी दिला आहे. परभणी जिल्ह्यात प्रथमच असा निर्णय जिल्हा निबंधकांनी घेतल्यामुळे अवैध सावकारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

सोनपेठ (जि. परभणी) - तालुक्‍यात बेकायदेशीरित्या सावकारी करणाऱ्या सावकाराच्या नावे असलेले खरेदी खत रद्द करून जमीन मूळ मालकाच्या नावे करण्याचा ऐतिहासिक निर्णय जिल्हा निबंधक गणेश पुरी यांनी दिला आहे. परभणी जिल्ह्यात प्रथमच असा निर्णय जिल्हा निबंधकांनी घेतल्यामुळे अवैध सावकारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

करम तांडा (ता. सोनपेठ) येथील राजू राठोड यांच्या वडिलांनी 2005 मध्ये वैद्यकीय खर्चासाठी नातेवाइकांकडून एक लाख रुपये कर्ज घेतले होते. त्या बदल्यात सुरक्षा म्हणून विना ताब्याचे शेतीचे खरेदीखत करून दिले होते. वडिलांच्या मृत्यूनंतर राजू राठोड यांनी सावकारास व्याजासह मुद्दल परतफेड करून जमिनीचे खरेदीखत करून मागितले. त्याला सावकाराने नकार दिला. म्हणून राठेड यांनी जिल्हा निबंधक कार्यालयात खासगी अवैध सावकाराविरुद्ध तक्रार अर्ज दाखल केल. या अर्जावरून आर. एम. कांबळे सहायक निबंधक सोनपेठ यांनी सदर प्रकरणाची चौकशी केली. यात राजू राठोड यांचे वडील लक्ष्मण राठोड यांनी त्यांच्या कुटुंबातील एकत्रित जमीन 2005 मध्ये कर्जासाठी सावकाराकडे गहाण ठेवली आहे. जमीन सावकाराच्या नावे असली तरी ती शेतकऱ्याच्या ताब्यात असल्याने खरेदीखत हे सावकारीसाठी गहाण म्हणून दिले असल्याचे स्पष्ट झाले. सदर प्रकरणात अवैध सावकारी असल्याचा अहवाल जिल्हा निबंधकांना सादर केला.

यावर सावकारांचे जिल्हा निबंधक गणेश पुरी यांनी सदर प्रकरणी सुनावणी घेऊन महाराष्ट्र सावकारी नियमन सुधारणा अधिनियम 2014 नुसार अवैध सावकाराचे खरेदीखत रद्द करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच अवैध सावकाराच्या नावे झालेला शेतीचा फेर रद्द करून मूळ शेतकऱ्याच्या नावे फेरफार घेण्यासाठी आदेश दिले आहेत. ऐतिहासिक आदेशाने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. तर अवैध सावकारी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Web Title: parbhani news marathi news sawkari ganesh puri maharashtra news