राज्य शासन असंवेदनशील - अशोक चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

परभणी - मराठवाड्यात एकामागून एक येणाऱ्या संकटांबाबत शासन गंभीर नाही. गारपिटीला 72 तास उलटले तरी साधे पंचनामे करण्याचे कामही केले जात नाही. यावरून राज्य शासनाची असंवेदनशीलता दिसून येते, अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी बुधवारी (ता. 14) केली. कॉंग्रेसच्या वतीने आयोजित कार्यकर्ता शिबिरासाठी ते परभणीत होते. शिबिराच्या उद्‌घाटनानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

गारपिटीमुळे मराठवाडा व खानदेशातील रब्बी पिके, फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. यात सात लोकांचा बळी गेला. या नुकसानीची मी पाहणी करत आहे. 48 तासांत मदत जाहीर करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते; परंतु 72 तास उलटून गेले तरी नुकसानीचे पंचनामे सुरू झाले नाहीत. गारपिटीत पूर्णा तालुक्‍यातील भागीरथीबाई कांबळे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबाला कोणतीही मदत शासनाने जाहीर केलेली नाही. यावरून शासनाची असंवेदनशीलता दिसून येते, अशी टीका त्यांनी केली.

आत्महत्या रोखण्यासाठी मंत्रालयाला जाळ्या लावल्या जात आहेत; पण शेतीच्या पिकाला दाम व बेरोजगारांच्या हाताला काम या दोन गोष्टींवर शासनाने लक्ष दिले तर जाळ्या लावण्याच्या कामाची गररज पडणार नाही, असा टोलाही श्री. चव्हाण यांनी लगावला. याबाबत विधिमंडळात मुद्दा उपस्थित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आम्हालाच यश मिळणार
येत्या विधानसभा व लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून पक्षपातळीवर संघटन बांधणीचे काम सुरू आहे. त्यासाठी जिल्हास्तरावर कार्यकर्त्यांची शिबिरे घेत आहोत. समविचारी पक्षांशी आघाडी करण्यासाठी प्रदेश पातळीवर बैठक घेऊन त्याचा अहवाल राष्ट्रीय पातळीवर पाठविला जाणार आहे. त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष याबाबत निर्णय घेतील, असेही चव्हाण यांनी सांगितले.

Web Title: parbhani news marathwada news state government Insensitive ashok chavan politics