परभणी : पीक उत्पादनात 50 टक्के घट; कृषी विभागाचा अंदाज

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

म्हणे दुबार पेरणी नाही
जिल्ह्यात एकाही हेक्टरवर दुबार पेरणी झाली नसल्याचे कृषी विभागाने नमूद केले आहे. प्रत्यक्षात पालम, गंगाखेड, सोनपेठ, पाथरी आणि इतर तालुक्यातील काही महसूल मंडळात दुबार पेरणी करावी लागली. दुस-यांदा खते, बियाणे घेण्यासाठी शेतक-यांच्या नाकी, नऊ आले; परंतु कृषी विभागाने दुबार पेरणीचा अहवाल टेबलावरून तयार केलला दिसतो.

परभणी : पावसाअभावी जिल्ह्यातील पिकांची परिस्थित अत्यंत वाईट असून काही ठिकाणी दुबार पेरणीलाही शेतक-यांना सामोरे जावे लागले. तूर्तास 50 टक्के उत्पादनात घट होणार असल्याचा अहवाल जिल्हा कृषी विभागाने पाठविला आहे. प्रत्यक्षात दयनीय अवस्था असल्याने जिल्ह्यातील शेतकरी देशोधडीला लागण्याची शक्यता आहे.

यंदा बरोबर मॉन्सूनला पावसाचे आगमन झाले होते. त्याचे असमान वितरण असल्याने अर्धवट पेरणी झाली होती. तदनंतर अडीच महिन्यात एकही दमदार पाऊस झाला नाही. अद्याप ओलीला ओलही गेली नाही आणि जमिनीबाहेर पाणीही निघालेले नाही. परिणामी, जलसाठ्यात वाढ झाली नसल्याने सध्या वाळत असलेल्या पिकांना पाणी देण्याचा प्रश्नच येत नाही. जिल्ह्यातील पालम, गंगाखेड, सोनपेठ आणि पाथरी तालुक्यातील काही महसूल मंडळात पिके उन्हामुळे होरपळली आहेत. त्याचा फटका मुख्य नगदी पीक सोयाबीनसह मूग आणि उडिदाच्या मिळून दोन लाख 57 हजार 551 हेक्टरवरील पिकांना बसला आहे. या पिकांचे उत्पादन 40 ते 50 टक्क्यांनी घटेल, असा अनुमान कृषी विभागाने वरिष्ठ कार्यालयास वर्तविला आहे. दुसरीकडे कापूस आणि तुरीचे क्षेत्र यापेक्षा अधिक आहे. अनुक्रमे एक लाख 87 हजार 510 आणि
87 हजार 250 हेक्टवर त्यांची पेरणी झाली आहे. कापसाला मावा, तुडतुडे, अळ्याने ग्रासले असून पाते व फुलगळ मोठ्या प्रमाणात होत आहे.

या पिकांचा अवधी लांब असला तरी त्याचे सरासरी उत्पादन मिळण्याची सूतराम शक्यता नाही. एकंदारीत जिल्ह्यात पेरणी झालेल्या पाच लाख सात हजार 210 हेक्टवरील पिके धोक्यात आहेत. त्यांची वाढ खुंटली, रोगग्रस्त पिके, उत्पादनात घट, ही अवस्था संपून पिके वाळण्यास सुरूवात झाली आहे. आणि ता.20 ऑगस्टपर्यंत पाववसाची शक्यता नसल्याने तोपर्यंत होत्याचे नव्हते होईल, यात शंक नाही.

म्हणे दुबार पेरणी नाही
जिल्ह्यात एकाही हेक्टरवर दुबार पेरणी झाली नसल्याचे कृषी विभागाने नमूद केले आहे. प्रत्यक्षात पालम, गंगाखेड, सोनपेठ, पाथरी आणि इतर तालुक्यातील काही महसूल मंडळात दुबार पेरणी करावी लागली. दुस-यांदा खते, बियाणे घेण्यासाठी शेतक-यांच्या नाकी, नऊ आले; परंतु कृषी विभागाने दुबार पेरणीचा अहवाल टेबलावरून तयार केलला दिसतो.

दुबार पेर अन् दुष्काळामुळे आत्महत्या
जिल्ह्यात ता.1 जुन आणि ता.31 जुलै 2017 पर्यंत 19 शेतक-यांनी जिवनयात्रा संपविली. पैकी बहूतांश शेतक-यांनी दुबार पेरणी आणि दुष्काळ परिस्थितीमुळे यंदा कर्जफेडता येत नाही, असे कारण समोर आले.

यंदाच्या वर्षात 31 आत्महत्याची नोंद शासन दरबारी झाली. 2016 साली 98, 2015 साली 104, 2014 साली 70, 2013 साली 5, 2012 साली 36, 2011 साली 25, 2010 साली 20, 2009 साली 23, 2008 साली 18, 2007 साली 28, 2006 साली 52, 2005 साली 9, 2004 साली 6, 2003 साली 4, 2002 साली 2 आत्महत्या झाल्या असून एकूण पंधरा वर्षांत 531 शेतक-यांनी मृत्यूला कवटळाले आहे.

Web Title: Parbhani news no rain, farmer condition