पहिल्याच पावसात परभणी बसस्थानकाची अवस्था दयनीय

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 जून 2017

स्थानकात घाण पाणी, प्रशासनाचे दुर्लक्ष 

डिग्गी नाला बसस्थानकाजवळ महापालिकेकडून फोडण्यात आला. तो दूस्तीसाठी वारंवार महापालिकेला पत्र पाठविले. बुधवारी देखील पत्र देण्यात आले. तरीही दुरूस्ती केली नसल्याने ही दुरावस्था झाली आहे.
- श्रीकांत गभणे, विभागीय नियंत्रक, परभणी.
 

परभणी : पहिल्याचा पावसात येथील 'व्यवस्थेचा ओढा' परभणी बसस्थानकातून वाहिल्याने स्थानकाला 'जल अन् गाळयुक्त' शिवाराचे स्वरूप आले आहे. त्याला जबाबदार महानगरपालिका आणि परिवहन विभाग ऐकमेकांवर 'चिखलफेक' करून वेळ मारून नेत आहेत. तर लोकप्रतिनिधी व प्रवाशी संघटनांनी ध्रुतराष्ट्रासारखी डोळ्याला पट्टी बांधल्याने प्रवाशांचे हाल पाहवत नाहीत.

अख्या परभणीचा घाण वाहून येणारा डिग्गी नाला परभणी बसस्थानकासमोर फोडण्यात आला होता. तो महापालिकेकडून फोडण्यात आल्याचे परिवहन विभागाकडून सांगण्यात आले. त्याला तीन वर्षांहून अधिक काळ लोटला. मात्र मंगळवारी (ता.6) मध्यरात्री झालेल्या पावसात संपूर्ण नाला बसस्थानकात उलथला. त्याने स्थानक जलमय आणि कचऱ्याने गळयूक्त झाले. अगदी पाय ठेवायलाही जागा नाही, एवढी दुरावस्था आणि दुर्गंधी स्थानकात झाली. नालीच्या पाण्यात कचरा, प्लास्टिक पिशव्या, मेनकापड, कागदे स्थानक परिसरात साचले. अगदी नदीला पूर येवून गेल्यानंतरचे चित्र बुधवारी स्थानकात पाहवयास मिळाले. सध्या वाळूचे वाहन नदीतून बाहेर काढल्यासारखी बस या पाण्यातून स्थानकात आत-बाहेर न्यावी लागते.

येथील पाण्यातून बसमध्ये चढल्यानंतर प्रवाशांना नदी ओलांडल्याची प्रचिती येते. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याने स्थानकाला वेडा दिला असून कोठे एक तर कोठे तीन फुटांपर्यंत पाणी साचले आहे. स्थानकासमोर पेपर विक्रेत्यांना जागा राहिली नसल्याने अक्षरशः नाल्यांच्या पाण्यात उभा राहावे लागत आहे. काहिंनी जागेपायी दुकानेही थाटली नाहीत. तर प्रवाशांनी मोठे दगड टाकून त्यावरून जाण्याचा प्रयत्न केला. महिला, वृद्ध प्रवाशी, लेकुरवाळी महिलांना त्यातून जाता येत नाही. हे प्रतिवर्षी होत असताना त्याची तमा कोणालाही नाही. महापालिका आणि परिवहन विभाग ऐकमेकांकडे बोट दाखवून नामानिराळे झाले. तरीही प्रतिवर्षी दुरूस्ती, डागडुज्जी, काँक्रेकीटकरणाचे टेंडर काडून थातूर-मातूर दुरूस्ती केली जाते. ती प्रत्यक्षात कमी अन् कागदावरच जास्त असते. हे चार-पाच वर्षांपासून प्रतिवर्षी होत असल्याने यापुढे देखील यापेक्षा निराळे होणार नाही. विशेष म्हणजे परिवहन मंत्री पूर्वी परभणीचे पालकमंत्री होते. त्यांच्या कर्मभूमीपैकीच एक परभणी जिल्हा असताना देखील हे चित्र पालटले नाही. मग प्रशासकीय अधिकारी काय करणार? या प्रश्नाचे उत्तर देण्याची गरज नाही.

डिग्ली नाल्याबाबत परिवहन विभागाकडून प्रत्यक्षात कोणीही येवून भेटले नाही. मागील दोन वर्षांत तशी तसदी कोणी घेतली नाही. आयुक्तांना देखील त्याबाबत सांगण्यात आले नाही. तरीही या दुरावस्थेची पाहणी करण्यासाठी संबंधीत अधिकारी पाठविण्यात आला आहे.
- अनिल गिते, उपायुक्त, महानगरपालिका, परभणी.

 

Web Title: parbhani news parbhani ST bus stop