विधान परिषदेच्या जागेसाठी चाचपणी

गणेश पांडे
रविवार, 27 ऑगस्ट 2017

विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीची परभणी जिल्ह्यात तयारी सुरु झाली आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत त्याची रंगीत तालीम पाहावयास मिळाली. जुन्याविरुध्दच्या संघर्षामध्ये नव्या नेतृत्वाने बाजी मारली असून विधान परिषदेच्या निवडणुकीतही हेच चित्र कायम राहण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे.

परभणी जिल्हा नियोजन समितीची निवडणूक नुकतीच झाली. तीत महापालिका क्षेत्र व जिल्हा परिषद क्षेत्रातील निवडणूक बिनविरोध झाली. परंतु नगरपालिका क्षेत्रात चार जागांसाठी निवडणूक झाली. त्याचे एकमेव कारण म्हणजे आमदार बाबाजानी दुर्राणी यांचे चिरंजीव, पाथरीचे उपनगराध्यक्ष जुनेद खान दुर्राणी यांना नियोजन समितीत येण्यापासून रोखण्याचा एकमेव प्रयत्न झाल्याचे दिसून आले. या गटात शिवसेना, काँग्रेसने आपले स्वतंत्र उमेदवार दिले होते. त्यांच्या पाठीमागे खासदार संजय जाधव, माजी मंत्री व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर,

माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर हे उभे असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली. त्यांच्या विरोधात जिल्ह्यातील अन्य राजकीय नेतेमंडळी सज्ज झाली. यात आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी उर्वरित सर्व नेत्यांची मोट बांधली. त्यामध्ये स्वपक्षाचे आमदार विजय भांबळे, डॉ. मधुसूदन केंद्रे, नुकतेच भारतीय जनता पक्षात गेलेले आमदार मोहन फड, उद्योजक रत्नाकर गुट्टे, सोनपेठचे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड, सेलूचे नगराध्यक्ष व बोर्डीकर यांचे कट्टर विरोधक विनोद बोराडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर यांना एकत्र करून ही निवडणूक लढविली.

राष्ट्रवादीकडून दुर्राणी यांच्या नावाची चर्चा
विधान परिषदेच्या परभणी - हिंगोली जागेसाठीची निवडणूक आगामी काळात होऊ घातली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुन्हा एकदा आमदार दुर्राणी यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना शह देण्यासाठी विरोधकांनी जिल्हा नियोजन समितीची निवडणूक संख्याबळ नसतानाही घडवून आणल्याचे बोलले जाते. 

भाजपकडून बोर्डीकर  यांचे नाव चर्चेत
विधान परिषदेच्या जागेसाठी भारतीय जनता पक्षाकडून माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. त्यासाठीही नियोजन समिती निवडणुकीच्या माध्यमातून एकत्र आलेल्या बोर्डीकरांसह खासदार जाधव, वरपुडकर या त्रयींनी चाचपणी केल्याचे दिसून येते. पुढे नेमके काय घडते, हे आगामी काळातच कळेलच.

Web Title: parbhani news vidhan parishad