परभणी : बुलडोझर स्मशानभूमीवर नव्हे तर बुरसटलेल्या मानसिकतेवर

जगदीश जोगदंड
Thursday, 22 October 2020

आवई येथील गावकऱ्यांनी एकत्र येत स्मशानभूमीवर नव्हे तर जुन्या अंधश्रद्धा आणि बुरसटलेल्या मानसिकतेवर घाव घालत पुरोगामी विचारांची कास धरली आहे.कुटूंबातील पूर्वजांचे दगडामातीचे स्मारक व समाध्या उभारण्यापेक्षा पूर्वजांच्या विचारांचे व शिकवणीचे सुंदर शिल्प पुढील पिढीत निर्माण करण्याचा संकल्प गावकऱ्यांनी केला आहे.

पूर्णा (जिल्हा परभणी) : जिल्ह्यात स्वच्छ आणि सुंदर स्मशानभूमीची चळवळ आता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक गावातील नागरीक या मोहिमेत आपले स्वंयस्फूर्तीने योगदान देत असल्याचे दिसून येत आहे. आवई (ता.पूर्णा) येथील गावकऱ्यांनी पुढाकार घेत गावातील स्मशानभूमीतील जुन्या समाध्या बुलडोजरच्या सहाय्याने काढून टाकण्यात आल्या.

आवई येथील गावकऱ्यांनी एकत्र येत स्मशानभूमीवर नव्हे तर जुन्या अंधश्रद्धा आणि बुरसटलेल्या मानसिकतेवर घाव घालत पुरोगामी विचारांची कास धरली आहे. कुटूंबातील पूर्वजांचे दगडामातीचे स्मारक व समाध्या उभारण्यापेक्षा पूर्वजांच्या विचारांचे व शिकवणीचे सुंदर शिल्प पुढील पिढीत निर्माण करण्याचा संकल्प गावकऱ्यांनी केला आहे.

हेही वाचाकोरोना इफेक्ट - नांदेड एसटी विभागास दोन कोटी ९४ लाखाचा तोटा; लांब पल्ल्‍याच्या बस लवकरच सुरू होणार -

स्मशानभूमीची जागा उकिरडे आणि वेड्या बाभळींनी वेढली आहे

कांतराव देशमुख झरीकर यांच्या स्वच्छ आणि सुंदर स्मशानभूमी अभियान आणि उप मुख्य कार्यकारी अधिकारी ओम यादव यांच्या वृक्षवल्ली फाऊंडेशनच्या कामाने जिल्ह्यात गती घेतली आहे. अनेक गावात अभियानाला सुरुवात झाली आहे. पूर्णा तालुक्यातील आव्हई येथे स्मशानभूमीला खूप मोठी जागा आहे. स्मशानभुमी लगतच खूप मोठा तलाव आहे. स्मशानभूमीची जागा उकिरडे आणि वेड्या बाभळींनी वेढली आहे. स्मशानभूमी म्हटलं की एक प्रकारची ओंगळवाणी परिस्थिती, मनात दाटून येणारी भुता-खेतांची भीती आदि गोष्टी मनात अगोदर येतात. प्राचीन काळापासून अनेक समाध्या बांधून बरीच जागा  इथे व्यापली आहे. या सर्व समाध्याही अनेक वर्षांपासून बांधलेल्या असल्याने मोडकळीस आलेल्या होत्या.

ईतर गावांचा आदर्श समोर ठेवून घेतला ठराव .

झरी, खांबेगाव, पोखर्णी आणि देऊळगाव दुधाटे या स्मशानभूमींचा आदर्श घेऊन या विस्तृत जागेवरील सर्व बोरी बाभळी आणि समाध्या काढून हा परिसर झाडे लावून सुशोभित करायचा संकल्प (ता. १७ ) आक्टोबर रोजी गावकर्‍यांनी बैठक घेऊन केला होता. या बैठकीला ग्रामपंचायतीचे प्रशासक प्रभाकर भोसले, मुख्याध्यापक प्रल्हाद कऱ्हाळे, ग्रामगीतेचे अभ्यासक डॉ. दिलीप शृंगारपुतळे यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीत ठरल्याप्रमाणे ता.२० आक्टोबर रोजी सकाळी जेसीबी मशिनच्या सहाय्याने सर्व समाध्या भुईसपाट करण्यात आल्या.

सुंदर स्मशानभुमीचा आराखडा तयार होणार

सपाटीकरणानंतर  लवकरच या ठिकाणी स्वच्छ आणि सुंदर स्मशानभूमीचा आराखडा तयार करून वृक्षवल्ली फाऊंडेशन रामपूरी अंतर्गत वृक्षारोपण करण्यात येणार आहे. कांतराव देशमुख झरीकर आणि परभणी जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी ओम यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामगीतेचे अभ्यासक डॉ. दिलीप शृंगारपुतळे, प्रशासक प्रभाकर भोसले, मुख्याध्यापक प्रल्हाद कराळे आणि सर्व ग्रामस्थ उत्साहाने काम करत आहेत.  स्मृती उद्यान आणि स्वच्छ आणि सुंदर स्मशानभूमी लवकरच इथे साकार करण्यासाठी ग्रामस्थांनी संकल्प केला आहे. या प्रसंगी सर्व ग्रामस्थांची उपस्थिती होती.

येथे क्लिक करामुदखेड सिआरपीएफ केंद्रात पोलिस स्मृती दिवस साजरा -

गावकऱ्यांचे मी मनापासून धन्यवाद देवून कौतूक

एक प्रकारे जुनाट विचारसरणी, अंधश्रद्धा यावरच गावकर्‍यांनी बुलडोझर चालवून बदलत्या काळात आवश्यक असलेल्या मूल्यांची कास धरत असल्याचे यातून दाखव दिले. खरंतर अतिशय संवेदनशील असा विषय गावकर्‍यांनी एकमताने हाताळून सर्व जागा खुली केली. गावकऱ्यांचे मी मनापासून धन्यवाद देवून कौतूक करतो.

- कांतराव देशमुख, सामाजिक कार्यकर्ते, परभणी.

समाधीला ओंगळवाणे भग्ण अवस्था प्राप्त

घरातील मोठ्या व्यक्तीच्या निधनानंतर त्यांची समाधी बांधण्याची प्रथा होती.पूर्वी जागाही मुबलक होतीत्या मयत व्यक्ती विषयीचा आदरभाव भावनिकतेतून व्यक्त केल्या जात असे पण समाधी बांधल्यानंतर किती वर्ष तीची देखभाल केल्या जात असे तीचे पावित्र्य जपल्या जात असे याचा प्रत्येकाने विचार करायला हवा. या गोष्टी आपल्याकडून होत नसतील त्या समाधीला ओंगळवाणे भग्ण अवस्था प्राप्त होत असेल , त्यांची हेळसांड होत असेल तर मग आपण आपण आपल्या पूर्वजांचा सन्मान वाढवतोय की कमी करतोय ? याचा विचार व्हावलाच हवा.

- डॉ.दिलीप शृंगारपुतळे, सामाजिक कार्यकर्ते, पूर्णा. 

संपादन - प्रल्हाद कांबळे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parbhani: Not on the bulldozer cemetery but on the rusty mentality parbhani news