esakal | परभणी : एक हजार ८४३ कृषिपंप ग्राहक झाले थकबाकी मुक्त; महा कृषी ऊर्जा अभियानात भरघोस सवलत
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

या ग्राहकांकडे सद्यस्थितीत १ हजार ३८६ कोटी रुपयांची एकूण थकबाकी आहे. यातील निर्लेखन, व्याज व विलंब आकाराचे एकूण ५७४ कोटी १० लाख रुपये महावितरणकडून माफ करण्यात आले आहेत. 

परभणी : एक हजार ८४३ कृषिपंप ग्राहक झाले थकबाकी मुक्त; महा कृषी ऊर्जा अभियानात भरघोस सवलत

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी  :  महा कृषी ऊर्जा अभियान २०२० च्या माध्यमातून महावितरणच्या परभणी मंडळा अंतर्गत असलेल्या ९६ हजार ८७० कृषिपंप ग्राहकांना वीजबिल कोरे करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या ग्राहकांकडे सद्यस्थितीत १ हजार ३८६ कोटी रुपयांची एकूण थकबाकी आहे. यातील निर्लेखन, व्याज व विलंब आकाराचे एकूण ५७४ कोटी १० लाख रुपये महावितरणकडून माफ करण्यात आले आहेत. 

या कृषी ग्राहकांनी उरलेल्या मूळ थकबाकीपैकी 50 टक्के रकमेचा वर्षभरात भरणा केल्यास थकबाकीची उर्वरित 50 टक्के रक्कम माफ करण्यात येणार आहे. सोबतच त्यांचे थकित वीजबिलही कोरे होणार आहे.

हेही वाचानांदेड : भेंडेवाडी व महालिंगी गावातील ५७ कृषिपंप ग्राहकांचे वीजबील झाले कोरे

कृषिपंपाच्या नवीन वीजजोडण्या तसेच वीजबिलांच्या वसुलीसाठी थकबाकी, व्याज व विलंब आकारात सवलत देणारे महा कृषी ऊर्जा अभियान ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या पुढाकारातून नुकतेच जाहीर झाले आहे. या धोरणानुसार परभणी जिल्हयातील १ हजार ८४३ कृषिपंप ग्राहकांनी ५८ लाख ९९ हजार रूपयांचा भरणा करत थकबाकी मुक्त झाले आहेत. यामध्ये परभणी ग्रामीण उपविभागातील ३१६ कृषिपंप ग्राहकांनी ८ लाख ३१ हजार, परभणी शहर उपविभागातील २९ कृषिपंप ग्राहकांनी ४ लाख २१ हजार, पाथरी उपविभागातील १८० कृषिपंप ग्राहकांनी ४ लाख ५२ हजार, पुर्णा उपविभागातील ३११ कृषिपंप ग्राहकांनी ९ लाख ६० हजार तर गंगाखेड उपविभागातील १६६ कृषिपंप ग्राहकांनी ४ लाख ८१ हजार, जिंतूर उपविभागातील ३०१ कृषिपंप ग्राहकांनी ७ लाख ७ हजार, मानवत उपविभागातील १२८ कृषिपंप ग्राहकांनी २ लाख ३७ हजार रूपये, पालम उपविभागातील २४१ कृषिपंप ग्राहकांनी ११ लाख ९९ हजार रूपये, सेलू उपविभागातील १२७ कृषिपंप ग्राहकांनी ४ लाख २१ हजार त्याचबरोबर सोनपेठ उपविभागातील ४४ कृषिपंप ग्राहकांनी १ लाख ८९ हजार रूपयांच्या थकबाकीचा भरणा केला आहे.

महा कृषी ऊर्जा अभियानात सर्व उच्च व लघुदाब कृषिपंप ग्राहक तसेच उपसा जलसिंचन योजनेतील चालू व कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांचा समावेश करण्यात आला आहे. या ग्राहकांच्या 5 वर्षांपूर्वीच्या थकबाकीवरील व्याज व विलंब आकार 100 टक्के माफ करण्यात आला आहे. तसेच 5 वर्षांपर्यंतच्या थकबाकीवरील विलंब आकार 100 टक्के माफ केले आहे. ज्या ग्राहकांनी या अभियानात एक ते तीन वर्षांसाठी सहभाग घेतला त्यांनी त्या-त्या वर्षी भरलेल्या मूळ थकबाकीच्या रकमेपैकी पहिल्या वर्षी 50 टक्के, दुसऱ्या वर्षी 30 टक्के आणि तिसऱ्या वर्षी 20 टक्के माफ करण्यात येईल. तसेच मूळ थकबाकीचा भरणा करताना चालू वीजबिलांची रक्कम भरणेही गरजेचे आहे.

येथे क्लिक करा - नांदेड : शेतकऱ्यांनी कृषी धोरणाचा लाभ घेवून विजबील थकबाकीतून मुक्त व्हावे- उपकार्यकारी अभियंता कादरी

66 टक्के रक्कम विद्युत यंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी

शेतकऱ्यांना वीजबिल थकबाकीमुक्तीची संधी तसेच वसूल झालेल्या बिलातील 66 टक्के रक्कम संबंधित ग्रामपंचायत व जिल्ह्यातील विद्युत यंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी वापरली जाणार असल्याने महावितरणतर्फे जिल्ह्यातील कृषिपंप ग्राहकांशी थेट संवाद साधून अभियानाची माहिती दिली जात आहे. तसेच वीजबिलांबाबत शंका किंवा तक्रारी असल्यास त्या तात्काळ दूर करण्याच्या सूचना क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आलेल्या आहेत.

कृषिपंप ग्राहकांना वीजबिलांची थकबाकी, माफी व भरावयाची रक्कम हा तपशील महावितरणने (https://billcal.mahadiscom.in/agpolicy2020/) या वेबपोर्टलवर उपलब्ध करून दिला आहे. केवळ ग्राहक क्रमांक टाकल्यावर या अभियानातील सवलत व भरावयाच्या रकमेसह इतर तपशील उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी महावितरणच्या संबंधित कार्यालयात संपर्क साधावा व वीजबिल थकबाकीमुक्तीच्या अभियानात सहभागी व्हावे.

- प्रविण अन्नछत्रे, अधीक्षक अभियंता, महावितरण परभणी

संपादन - प्रल्हाद कांबळे

loading image