जालनेकरांना परभणीची धास्ती! 

जालनेकरांना परभणीची धास्ती! 

परभणी - परभणी जिल्हा परिषदेत "कमळ' फुलविण्यासाठी पाणीपुरवठामंत्री आणि जिल्ह्याचे संपर्कमंत्री बबनराव लोणीकर यांनी जरा जास्तच धास्ती घेतली आहे. त्यामुळे सर्वांत आधी प्रचारसभांचा धडाका सुरू करून त्यांनी शतप्रतिशत वातावरणनिर्मिती करून पक्षाचे उमेदवार, कार्यकर्त्यांत बळ आणण्याचा प्रयत्न केला आहे. सोमवारी एकाच दिवशी चार ठिकाणी सभा घेत त्यांनी विरोधकांना आव्हान दिले आहे. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हेही बुधवारी (ता. आठ) परभणीत येत असल्याने दोन्ही जालनेकरांना परभणीची काळजी अन्‌ धास्ती वाटत असल्याचे चित्र आहे. 

जिल्हा परिषदेच्या रणधुमाळीला चांगला रंग चढला आहे. सर्वच पक्षांकडून "बंडोबां'ची अर्ज माघारीसाठी मनधरणी सुरू असताना भाजपने थेट प्रचारसभांना सुरवात केली आहे. यंदाच्या निवडणुकीत एकाही पक्षाला संपूर्ण जागेवर उमेदवार मिळाले नाहीत. शिवसेना 50, कॉंग्रेस 40 आणि राष्ट्रवादी व भाजप यांना प्रत्येकी 47 उमेदवार मिळाले आहेत. त्यामुळे कोणत्या पक्षाची किती ताकद आहे, याचा प्रत्यय येत आहे. जिल्ह्यात बाळसे धरण्याचा प्रयत्न करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सूर गवसल्यासारखे वाटत आहे. त्यामुळे ही संधी सोडायची नाही, असा निश्‍चय करीत भाजपने शतप्रतिशत मोहीम सुरू केली आहे; परंतु पक्षाला शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे मोठे आव्हान आहे. त्यामुळे ही मोहीम काही सोपी नाही, हे ओळखून भाजपने कंबर कसली आहे. त्यामुळेच जिल्ह्याची जबाबदारी सोपविल्यानंतर बबनराव लोणीकर यांनी जास्त धास्ती घेतली असून, ते अधिकच सक्रिय झाले आहेत. जिल्हा पिंजून काढण्यास सुरवात केली आहे. प्रत्येक आठवड्यात जिल्ह्यात येत सभा, मेळावे घेऊन वातावरणात रंग भरण्याचे काम सुरू केले आहे. सोमवारी (ता. सहा) जिल्ह्यात त्यांच्या चार ठिकाणी झाल्या. या सभांत त्यांनी दोन्ही कॉंग्रेसपेक्षा युती तोडणाऱ्या शिवसेनेवर टीका करीत राग व्यक्त केला. आम्ही कोणत्याही स्थितीत सत्ता आणणारच, असा विश्वास ते व्यक्त करीत आहेत. जालना जिल्हा हा परभणीपेक्षा निधी खेचण्यात किती मागे आहे, याची आकडेवारी प्रत्येक सभेत देत त्यांनी शिवसेनेला डिवचले आहे. दुसरीकडे ऐनवेळी अन्य पक्षातील नाराजांच्या हाती "कमळ' देत सत्तेसाठी कायपण, हे त्यांनी दाखवून दिले आहे. 

दरम्यान, भाजपने यंदा परभणी जिल्ह्यावर जरा जास्तच लक्ष दिल्याचे दिसून येत आहे. या जिल्ह्याची जबाबदारी जावई या नात्याने लोणीकरांवर सोपविली असली तरी आणखी एका जालनेकरांवर प्रचाराची धुरा टाकली आहे. प्रदेशाध्यक्ष या नात्याने रावसाहेब दानवे यांनी मागील महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यात मेळावा घेतला होता. आता बुधवारी (ता. आठ) वझूर (ता. पूर्णा) येथे ते प्रचारसभा घेणार आहेत. 

दोन्ही कॉंग्रेसमध्ये प्रचाराचे नियोजन 
शिवसनेने सोमवारी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत प्रचाराचा नारळ फोडला आहे. दोन्ही कॉंग्रेसमध्ये केवळ मतांच्या गणिताची आकडेमोड सुरू आहे. प्रचाराचे निजोयन सुरू झाले असले, तरी कोणाला आणायचे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे दोन्ही कॉंग्रेसच्या गोटातून सांगितले जात आहे. असे असले तरी दोन्ही कॉंग्रेसतर्फेही प्रचाराची रणधुमाळी उडणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com