आधी रस्ता, मगच लग्न; 'त्या' सात तरुणांनी घेतला निर्णय

टीम ई-सकाळ
शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2019

सोनपेठ तालुक्‍यातील गोदाकाठच्या अकरा गावांना जोडणाऱ्या ग्रामीण मार्ग क्रमांक 25 ची दुरवस्था आहे. त्यामुळे या गावांतील ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागतो.

सोनपेठ (जि. परभणी) : सोनपेठ तालुक्‍यातील गोदाकाठच्या गावांचे रस्त्यासाठीचे आंदोलन आता अधिकाधिक तीव्र होत आहे. रस्त्याचा प्रश्‍न सुटेपर्यंत विवाह न करण्याचा निर्धार या तालुक्‍यातील लासीना येथील सात युवकांनी केला आहे.

'शिवसेनेनं ठरवावं भाजपच्या किती प्रभावाखाली रहायचं'

सोनपेठ तालुक्‍यातील गोदाकाठच्या अकरा गावांना जोडणाऱ्या ग्रामीण मार्ग क्रमांक 25 ची दुरवस्था आहे. त्यामुळे या गावांतील ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्रस्त ग्रामस्थांनी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्काराचा इशारा दिला होता. त्यानुसार तालुक्‍यातील आठ गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला. या आठ गावांतून केवळ एकच मतदान झाले. या बहिष्कारादरम्यान सर्व आंदोलनात अग्रस्थानी असलेल्या उमेश कदम या युवकाने लासीना येथे झालेल्या आठ गावांच्या महापंचायतीत गोदाकाठचा रस्ता पूर्ण होईपर्यंत विवाह न करण्याचा निर्धार केला होता. त्याच्या या निर्धाराला साथ देण्यासाठी लासीना येथील आणखी सहा युवक सरसावले. त्यात गोविंद परांडे, निवृत्ती परांडे, भगीरथ कदम, विष्णू कदम, भगीरथ परांडे, केशव परांडे या युवकांचा समावेश आहे. त्यांनीही रस्ता होईपर्यंत विवाह न करण्याचा निर्धार करून हे आंदोलन तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.

तेरी मेरी यारी 60 वर्षांनंतरही लई भारी

रस्त्यासाठी एकवटली गावे
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे गोदाकाठच्या ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सामाजिक दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. लग्न जुळणे, चांगली व योग्य स्थळे मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे अनेक वर्षे अन्याय सहन करणारी गोदाकाठची ही गावे रस्त्याप्रश्‍नी एकवटली आहेत. त्यात तरुणांनी पुढाकार घेतला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: parbhani seven youth take decision will marry after road construction