परभणी : टीईटी घोटाळ्यातील यादी व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

TET Exam

परभणी : टीईटी घोटाळ्यातील यादी व्हायरल

परभणी : वर्ष २०१९ पाठोपाठ वर्ष २०१८ मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत झालेला गैरप्रकार पुढे येत आहे. या प्रकरणी पुणे शह पोलिस आयुक्तांनी ता. २१ मार्च २०२२ ला शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना पत्र पाठवून या परीक्षेत मूळ निकालपत्रातील अपात्र परंतु गुण वाढवून पात्र ठरलेल्या एक हजार ७०१ परीक्षार्थींची यादी सादर केली आहे. ही यादीदेखील आता व्हायरल झाली असून, यामध्येसुद्धा जिल्ह्यातील अनेक शिक्षक अडकल्याचे चित्र आहे. पण, यादीच्या सत्यतेबाबत संभ्रमावस्था आहे.

वर्ष २०१३ पासून टीईटी परीक्षेतील गैरप्रकार शोधले जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. परंतु, शिक्षण विभागाने अद्यापही यादीतील शिक्षकांचे भवितव्य नेमके काय या बद्दल स्पष्ट केलेले नाही. वर्ष २०१९ मध्ये झालेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेतील मोठा घोटाळा उघडकीस आला. पुणे शहर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना आरोग्य विभागाच्या परीक्षेत झालेल्या गैरप्रकारांची चौकशी करीत असताना शिक्षक पात्रता परीक्षेतील गैरप्रकार समोर आले व त्याची त्यांनी कसून चौकशी केली असता

आरोग्य विभागाच्या परीक्षेतील गैरप्रकारापेक्षा या परीक्षेतील मोठे घबाड व मोठे मासे त्यांच्या हाती लागले. चौकशी अंती या परीक्षेतील सात हजार ८८० परीक्षार्थींनी टीईटी परीक्षेत गैरप्रकार केल्याची यादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सादर केली होती व त्यावरून परिषदेने यादी परीक्षार्थींची त्या परीक्षेतील संपादणूक रद्द करून त्यांना पुढे ही परीक्षा देण्यास कायमस्वरूपी बंदी घातली आहे.

यादी वर्ष २०१८ ची

शिक्षक पात्रता परीक्षा वर्ष २०१८ चे मूळ निकालपत्रातील अपात्र परीक्षार्थींचे गुण वाढविले या विषयानुसार पुणे शहर आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शालेय शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांना ता. २१ मार्च २०२२ ला वर्ष २०२१ मध्ये पुणे शहर सायबर पोलिस ठाण्यामध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने एक हजार ७०१ अपात्र परीक्षार्थींची यादी सादर केली. या यादीबाबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे यादीच्या सत्यतेबाबत संभ्रमावस्था असली तरी ती व्हारयल झाली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या यादीमध्ये जिल्ह्यातील अनेक शिक्षकांची नावे समाविष्ट असल्याचे समजते. परंतु परीक्षा परिषद काय निर्णय घेते याकडे शिक्षण वर्तुळाचे विशेषतः यादीत नावे असलेल्या शिक्षकांचे लक्ष लागले आहे.

अपात्र ठरवले, परीक्षेस बंदी घातली, पुढे काय?

वर्ष २०१९ असो वर्ष २०१८ च्या टीईटी परीक्षेतील गैरप्रकार. यामध्ये बहुतांश सहशिक्षक म्हणून नोकरी करणाऱ्या परंतु टीईटी परीक्षेत अपात्र ठरण्याची भीती असलेल्या पगारदार शिक्षकांचा मोठा भरणा आहे. परीक्षा परिषदेने गैरप्रकारात अडकल्यामुळे अपात्र ठरवले, संपादणूक रद्द केली, पुढील परीक्षेस कायमस्वरूपी बंदी घातली. परंतु, पुढे काय? हा प्रश्न अद्यापही शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने सोडवला नाही. शिक्षकांच्या नोकरीवर गंडांतर येणार की पुन्हा एक संधी देणार याबाबतदेखील चर्चा होऊ लागल्या आहेत.

Web Title: Parbhani Tet Exam Scam List Viral Education Teachers

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..