परभणी : मुरुमाऐवजी काळ्या मातीचा वापर, तडे तर जाणारच ! परभणी- गंगाखेड रस्त्याचे वास्तव

प्रा. डॉ. अंकुश वाघमारे | Sunday, 27 December 2020

गंगाखेड-परभणी हे नंतर ४० किलोमीटरचे आहे. या प्रवासासाठी प्रवाशांना तब्बल दोन तासाचा वेळ लागत असे. या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांनी रस्त्याची दुरावस्था शासनासमोर मांडली,नरेंद्र मोदी महामार्ग असे नामकरण नागरिकांतर्फे करण्यात आले,

गंगाखेड (जिल्हा परभणी) : गंगाखेड- परभणी हा महामार्ग वाहन चालक, मालक व प्रवाशांच्या जिव्हाळ्याचा आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर तत्कालीन मंत्रिमंडळाने गंगाखेड- परभणी या राष्ट्रीय महामार्गास मंजुरी देत सिमेंट रोडसाठी निधी उपलब्ध करून दिला. सदरील रोडचे काम सुरू असताना संबंधित ठेकेदाराने मुरूम टाकून दबई करण्याऐवजी अनेक ठिकाणी काळ्या मातीचा वापर केला. त्यामुळे तडे तर जाणारच ! या राष्ट्रीय महामार्गावर गेलेल्या तड्यामुळे रस्ता पूर्ण होण्याअगोदरच रस्त्याच्या गुणवत्तेचे  पितळ उघडे पडले आहे.

गंगाखेड- परभणी हे नंतर ४० किलोमीटरचे आहे. या प्रवासासाठी प्रवाशांना तब्बल दोन तासाचा वेळ लागत असे. या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांनी रस्त्याची दुरावस्था शासनासमोर मांडली. नरेंद्र मोदी महामार्ग असे नामकरण नागरिकांतर्फे करण्यात आले. प्रवासी संघटनेची मागणी, नागरिकांची ओरड, पत्रकारांचा वेळोवेळी पाठपुरावा यामुळे राज्य शासनाने २४० कोटी रुपयाचा निधी देत रस्त्याच्या कामास मंजुरी देत सदरील रस्त्याच्या देखरेखीचे काम कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग जालना यांच्याकडे दिले.

हेही वाचापरभणी : मुंबईच्या डाॅक्टर महिलेला सोने देण्याच्या बहाण्याने आठ लाखास लूटले, सेलू येथील घटना

Advertising
Advertising

गंगाखेड- परभणी या रस्त्याच्या कामास प्रारंभ झाल्यानंतर रस्ता खोदून याठिकाणी मुरूम भरत दबई करावे अशी नियमावली आहे. परंतु संबंधित ठेकेदाराने रस्त्याच्या अनेक ठिकाणी काळ्या मातीचा वापर केल्याचे वृत्त प्रकाशित झाले होते. परंतु प्रशासनातील अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे कानाडोळा केला. ठेकेदाराने चक्क काळ्या मातीचा वापर करून या रस्त्याची दबई केली. यामुळे रस्ता पूर्ण होण्याअगोदरच सदरील रस्त्यावर तडे गेले. रस्त्याचे काम ६० टक्के पूर्ण झाले आहे. सिमेंट रोडचे काम सुरू असताना रोडला गेलेले तडे पाहून नागरिकात शासन व प्रशासनाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रशासन व ठेकेदाराच्या मिलीभगतीचा भुर्दंड नागरिकांना आर्थिक, शारीरिक, मानसिक स्वरूपात सहन करण्याची वेळ येणार आहे. यामुळे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन गुणवत्तापूर्ण रस्ता निर्माण करावा.अशी मागणी प्रवाशांसह नागरिकातून समोर येत आहे.

अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गंगाखेड- परभणी रस्त्याच्या कामास मुहूर्त सापडला आहे. या रोडचे काम गुणवत्तापूर्ण व्हावं हीच सर्वांची अपेक्षा आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी ठेकेदाराकडून गुणवत्तापूर्ण रोड करून घेणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून भविष्यात प्रवाशांना त्रास होणार नाही.

- भारत हत्तीअंबीरे, नागरिक, गंगाखेड.

 

संपादन-  प्रल्हाद कांबळे