परभणीत विटेकरांना मिळणार संधी 

file photo
file photo

परभणी : पाथरी येथे रविवारी (ता. पाच) झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आपेक्षेप्रमाणे राजेश विटेकर यांच्या मातोश्री निर्मलाबाई विटेकर यांच्या नावावर एकमत झाल्याची सूत्रांनी माहिती दिली. उपाध्यक्षपदाचा अंतिम निर्णय सोमवारी (ता. सहा) होणार असला तरी सध्या राजेंद्र लहाने यांचे नाव पुढे आल्याची माहिती आहे. विद्यमान तीन आमदार आणि एका माजी आमदारांच्या उपस्थित सर्वपक्षीय सदस्यांच्या बैठकीत प्रीतिभोजनाचा अनोखा संगम पाहायला मिळाला.

येथील जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ गत सप्टेंबर महिन्यात संपला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीमुळे त्यांना १२० दिवसांची मुदत मिळाली होती. ता. २० डिसेंबर रोजी मुदतवाढदेखील संपल्याने अध्यक्षपद निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला. त्यानुसार मंगळवारी (ता. सात) नव्या अध्यक्षांची निवड होणार आहे. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे २४ सदस्य आहेत. २८ सदस्यांचे बहुमत लागत असल्याने केवळ चार सदस्यांची गरज आहे. त्यामुळे फार काही धावाधाव नसली तरी राज्यात महाविकास आघाडी झाल्याने आणि अन्य जिल्हा परिषदांमध्ये महाविकास आघाडी होत असल्याने परभणीतही हाच ‘फार्म्युला’ मागील काही दिवसांपासून चर्चेत होता. त्यानुसार आघाडीच्या बैठका सुरू झाल्या होत्या. मात्र, कोणाला काय द्यायचे यावर एकमत होत नव्हते. त्यातच मंत्रिमंडळाच्या विस्तारामुळे जिल्ह्यातील नेते मुंबईत गेल्याने चर्चा थांबली होती. चार दिवसांपूर्वी नेते जिल्ह्यात परतले आहेत. त्यामुळे पुन्हा चर्चा सुरू झाली.

अध्यक्षपद जिंतूरला की पाथरी मतदारसंघाला
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी रविवारी पाथरी येथील फार्महाऊसवर सर्वपक्षीय नेते आणि सदस्यांची बैठक बोलावली. बैठकीला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश वरपुडकर, शिवसेनेचे आमदार डॉ. राहुल पाटील, जिंतूरचे माजी आमदार विजय भाबंळे, जिल्हाप्रमुख विशाल कदम, सुरेश ढगे उपस्थित होते. ५४ पैकी ५२ सदस्य उपस्थित होते. त्यात भाजपच्या चार सदस्यांचा समावेश आहे. अध्यक्षपद जिंतूरला की पाथरी मतदारसंघाला, यावरून मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीत अंतर्गत वाद सुरू होता. जिंतूर मतदारसंघात राष्ट्रवादीचे १३ सदस्य आहेत, तर उर्वरित तालुक्यांत ११ सदस्य आहेत. विद्ममान अध्यक्षपद जिंतूरकडे असल्याने या वेळेस अन्य मतदारसंघांचा विचार होणे आपेक्षित होते. त्यानुसार सुरवातीपासून निर्मलाबाई विटेकर यांचे नाव आघाडीवर राहिले. त्यांच्या नावाला वरिष्ठ पातळीवरदेखील पसंती देण्यात आली. तसेच आमदार बाबाजानी दुर्राणी यांनीच विटेकरांचे नाव पुढे केले आहे. मात्र, तरीही जिंतूरमधून विरोध होऊ लागला. अखेर ठरल्याप्रमाणे निर्मलाबाई विटेकर यांच्या नावावर एकमत झाले आहे. या बाबत मंगळवारी (ता. सात) सकाळी अधिकृत घोषणा होणार आहे. शिवसेना, काँग्रेसला प्रत्येकी एक सभापतिपद देण्याचे ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

उपाध्यक्षपदी लहाने ?
उपाध्यक्षपद हे भांबळे गटाकडे राहण्याची शक्यता असून त्यासाठी वालूर (ता. सेलू)चे सदस्य आणि श्री. भांबळे यांचे कट्टर समर्थक राजेंद्र लहाने यांचे नाव समोर येत आहे. याआधाही राजेश विटेकर हे अध्यक्ष असताना श्री. लहाने हे उपाध्यक्ष होते. आता पुन्हा विटेकर-लहाने असा फाम्युर्ला समोर येत आहे.

हेही वाचा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला विजेतेपद ​

बाबाजानी दुर्राणी यांचा करिष्मा
जे राज्यात होत नाही ते परभणीत होतय. जिल्हा परिषदेच्या राजकारणात किंग मेकर असणाऱ्या बाबाजानी दुर्राणी यांनी नेहमीच परभणीत अनोखा पॅटर्न करून जिल्हा परिषदेतील सत्ता टिकवली आहे. गत अडीच वर्षांपूर्वीही त्यांनी शिवसेना वगळता सर्वपक्षीय मोट बांधली होती. आता तर शिवसेनेसोबत त्यांनी पुन्हा सत्ता कायम राहण्यासाठी पुढाकार घेतला आहे. कोणी कितीही आदळआपट केली तरी जे बाबाजानींच्या मनात, तेच प्रत्यक्षात, असा काहीसा अनुभव येत आहे. राज्यात सगळीकडे भाजपविरोधात सर्वपक्षीय एकवटले असताना परभणीत मात्र, भाजपचे सदस्य बिनशर्त महाविकास आघाडीसोबत कायम राहिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com