परभणी : शासकीय महाविद्यालयासाठी शुक्रवारी महिलांचे घेराव आंदोलन

गणेश पांडे
गुरुवार, 20 सप्टेंबर 2018

परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मंजूरी मिळावी यासाठी खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु आहे. ता. तीन सप्टेंबर रोजी सर्वपक्षीय धरणे आंदोलन झाले. त्या पाठोपाठ ता. 11 सप्टेंबर रोजी विद्यार्थांचा भव्य मोर्चा काढण्यात आला.

परभणी : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी समस्त परभणीकरांच्या वतीने आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे. आंदोलनाचा तीसरा टप्पा शुक्रवारी (ता. 21) महिलांच्या घेराव आंदोलनाने पूर्ण होणार आहे अशी माहिती खासदार संजय जाधव यांनी गुरुवारी (ता. 20) पत्रकार परिषदेत दिली.

परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मंजूरी मिळावी यासाठी खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु आहे. ता. तीन सप्टेंबर रोजी सर्वपक्षीय धरणे आंदोलन झाले. त्या पाठोपाठ ता. 11 सप्टेंबर रोजी विद्यार्थांचा भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मागणीच्या  आंदोलनाने अधिकच धार घेतली. आता आंदोलनाचा तिसरा टप्पा जिल्हयातील महिलांचा असणार आहे. शुक्रवारी (ता. 21) सकाळी 11 वाजता हजारो महिला जिल्हाधिकारी कार्यालयास घेराव घालण्यासाठी आंदोलनात सहभागी होतील अशी माहिती खासदार संजय जाधव यांनी दिली. पुढे खासदार श्री जाधव म्हणाले, जिल्ह्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळावे यासाठीची मागणी अनेक वर्षापासूनची आहे. परंतू त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केल्या गेले. परंतू आता उस्मानाबाद व चंद्रपुर सारख्या जिल्हयाला हे महाविद्यालय मिळते तर परभणीला का नाही ? परभणीने संपूर्ण निकष पूर्ण केलेले असतांनाही अद्याप शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी येथील जनतेला रस्तावर उतरावे लागते हे दुर्देव आहे. 

त्यामुळे जिल्ह्याच खासदार या नात्याने मी स्वता या जनआंदोलनात उतरलो आहे. दिवाळी पूर्वीच परभणीकरांची मागणी पूर्ण होईल अशी आपल्याला आशा आहे. त्यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना व आरोग्यमंत्री गिरीष महाजन यांची भेट घेतली आहे. दोघे ही परभणीकरांच्या मागण्यासाठी सकारात्मक आहेत असे ही त्यांनी सांगितले. महिलांचे घेराव आंदोलन झाल्यानंतर याच मागणीसाठी एक मोठे आंदोलन आपण छेडणार असल्याची माहिती ही त्यांनी यावेळी दिली. नुकतेच जिल्ह्यातील आजी - माजी आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी लावून धरली आहे. त्यांचे आपण स्वागत करतो असे ही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी जिल्हा प्रमुख विशाल कदम व विधानसभा प्रमुख माणिक पोंढे पाटील यांची उपस्थित होती.

 

Web Title: Parbhani Womens agitation on Friday for the government college