जबाबदाऱ्या निश्‍चितीने प्रचाराचे धुमशान 

कैलास चव्हाण 
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

परभणी - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी सर्वांत जास्त उमेदवार देणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने विद्यमान आमदारांना आपापले मतदारसंघ, तर अन्य पदाधिकाऱ्यांना तालुके सांभाळण्यासाठी जबाबदारी सोपविली आहे. एकप्रकारे निवडणुकीच्या प्रचाराची वाटणी केली आहे. त्यामुळे निकालानंतर कोणाचा किती प्रभाव आहे, हे उघड होणार आहे. दरम्यान, सुरवातीला जोरात धाव घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या कॉंग्रेसला केवळ 40 उमेदवार मिळाले असल्याने 14 ठिकाणी कोणासाठी माघार घेतली, याबाबत जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. 

परभणी - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी सर्वांत जास्त उमेदवार देणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने विद्यमान आमदारांना आपापले मतदारसंघ, तर अन्य पदाधिकाऱ्यांना तालुके सांभाळण्यासाठी जबाबदारी सोपविली आहे. एकप्रकारे निवडणुकीच्या प्रचाराची वाटणी केली आहे. त्यामुळे निकालानंतर कोणाचा किती प्रभाव आहे, हे उघड होणार आहे. दरम्यान, सुरवातीला जोरात धाव घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या कॉंग्रेसला केवळ 40 उमेदवार मिळाले असल्याने 14 ठिकाणी कोणासाठी माघार घेतली, याबाबत जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. 

जिल्हा परिषदेवर मागील 10 वर्षांपासून राष्ट्रवादीची सत्ता आहे. कधी भाजप, कॉंग्रेस, तर कधी शेकापच्या मदतीने सत्ता कायम ठेवण्यात राष्ट्रवादीने यश मिळविले आहे. कोणत्या तालुक्‍याचे किती सदस्य यावरून पदे आणि महत्त्व दिले गेल्याने यंदाही निवडणुकीतच अशा प्रचाराच्या वाटण्या केल्या आहेत. प्रत्येकाने आपापले तालुका सांभाळले तरी खूप झाले, अशी भूमिका घेत विद्यमान आमदारांसह पक्षाच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला लावली आहे. आमदारांनी आपापले विधानसभा मतदारसंघ सांभाळायचे असल्याने जिंतूरचे आमदार विजय भांबळे यांच्याकडे सेलू-जिंतूर, तर गंगाखेडचे आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे यांच्याकडे गंगाखेड, पालम व पूर्णा तालुक्‍याची जबाबदारी दिली आहे. पाथरी-मानवत हे राष्ट्रवादीचे बालेकिल्ले आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्याकडे, तर सोनपेठ तालुका विद्यमान अध्यक्ष राजेश विटेकर यांच्याकडे, परभणी तालुक्‍यातील; परंतु पाथरी विधानसभा मतदारसंघातील भाग माजी खासदार आणि पक्षाचे राज्य उपाध्यक्ष गणेशराव दुधगावकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ऍड. बाळासाहेब जामकर, शहर जिल्हाध्यक्ष, स्वराजसिंह परिहार यांच्यावर जबाबदारी निश्‍चित केली आहे. उमेदवारी वाटप करतानाही याचप्रमाणे अधिकार देण्यात आले होते. 

राष्ट्रवादीला पाथरी आणि जिंतूर मतदारसंघ अनुकूल असले, तरी तेथे या वेळेस कॉंग्रेस, शिवसेनेसोबत भाजपाचेही आव्हान असणार आहे. कोद्री (ता. गंगाखेड) आणि टाकळी कुंभकर्ण (ता. परभणी) वगळता अन्य 52 ठिकाणी राष्ट्रवादीने उमेदवार उभे केले आहेत. तीन आमदार आणि एक माजी खासदार अशी फळी असणाऱ्या राष्ट्रवादीला सत्ता कायम राखण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. 

माजी मंत्री सुरेश वरपुडकरांच्या एकहाती नेतृवाखाली लढणाऱ्या कॉंग्रेसला जिल्ह्यात 14 गटांत उमेदवार मिळाले नाहीत. ही मोठी नामुष्की म्हणावी लागणार आहे. जिल्ह्यात कॉंग्रेसचे केवळ 40 उमेदवार उभे आहेत. परभणी तालुक्‍यात झरी आणि पिंगळी आणि गंगाखेड तालुक्‍यातील राणीसावरगाव, कोद्री येथेही कॉंग्रेसचे उमेदवार नाहीत. जिल्हा परिषद निवडणुकीत मोजक्‍याच ठिकाणी उमेदवार देण्यामागे कॉंग्रेसची काय भूमिका असेल हे मात्र निकालानंतरच स्पष्ट होणार असले, तरी शिवसेनेशी वाढलेली जवळीक हेच यामागचे कारण असल्याचे राजकीय गोटात बोलले जात आहे. 

पाथरीत कॉंग्रेसने टाकली नांगी 
पाच गट असलेल्या पाथरी तालुक्‍यात कॉंग्रेसने सपशेल माघार घेत येथे एकही उमेदवार दिला नाही. या ठिकाणी राष्ट्रवादी आणि शिवसेनेची थेट लढत होत आहे. कॉंग्रेसच्या या भूमिकेमुळे तालुक्‍यात इच्छुक नाराज झाले असून, "तुमच्या राजकारणात आमचा बळी गेला' असे कार्यकर्ते बोलू लागले असून, नेमका कोणाचा प्रचार करायचा हेच समजत नसल्याने या तालुक्‍यातील कॉंग्रेसची फळी बुचकाळ्यात पडली आहे. 

Web Title: parbhani zp & pan