प्रस्थापितांकडून वारसदारांची सोय! 

प्रस्थापितांकडून वारसदारांची सोय! 

परभणी - परभणी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सर्वच पक्षांत घराणेशाहीने कळस गाठला आहे. प्रस्थापितांच्या नातलगांनी अनेक जागांवर उमेदवारी मिळवली आहे. त्यामुळे सामान्य कार्यकर्ते बाजूला पडले आहेत. घराणेशाहीमुळे सर्वच पक्षांनी कुटुंबासाठी पक्षनिष्ठा खुंटीला टांगत अन्य पक्षांशी साटेलोटे करत "प्रासंगिक' करार केल्याने नव्या राजकारणाची नांदी सुरू झाली आहे. "घरच्यांसाठी कायपण' अशी भूमिका घेत सगळा मॅनेज कार्यक्रम सुरू करून आपल्या वारसदारांची पुढची सोय करण्यास सुरवात केल्याची चर्चा रंगत आहे. 

राजकारणात सक्रिय होण्याचा राजमार्ग असलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीवर प्रस्थापितांनी हक्क दाखवत आपल्या वारसदारांच्या नव्या प्रवासाचा श्रीगणेशा केला आहे. "आपले कोणीतरी जिल्हा परिषदेत असले पाहिजे,' असा विचार करीत अनेक पुढाऱ्यांनी आपल्या नातलगांना पक्षाच्या तिकिटावर उभे केले आहे. त्यामुळे पक्षाच्या उमेदवारांसह कुटुंबातील उमेदवारांसाठीही प्रस्थापितांना काम करावे लागेल. घराणेशाहीसाठी काहींनी अन्य पक्षाच्या उमेदवाराशी साटेलोटे करीत छुपी युती केली आहे. एकमेका साह्य करू... असे म्हणत हे सारे चालले आहे. शिवसेना आणि कॉंग्रेसच्या प्रासंगिक कराराची चर्चा जिल्ह्यात जोरात सुरू आहेच. 

माजी मंत्री आणि कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर यांचे पुत्र समशेर, वहिनी दीपा वरपुडकर, माजी खासदार तुकाराम रेंगे यांचे पुत्र बाळासाहेब, दिवंगत माजी मंत्री रावसाहेब जामकर यांचे नातू संग्राम, माजी आमदार कुंडलिक नागरे यांच्या सून अमृता नागरे, माजी आमदार माणिकराव आंबेगावकर यांच्या सून वैशाली आंबेगावकर, माजी आमदार सीताराम घनदाट यांचे नातू भरत, दिवंगत माजी आमदार हनुमंत बोबडे यांच्या पत्नी ऍड. शोभा बोबडे, उद्योगपती तथा रासप नेते रत्नाकर गुट्टे यांचे जावई राजेश फड हे निवडणूक लढवीत आहेत. 

आजी-माजी पदाधिकारी आखाड्यात 
या बड्या प्रस्थापितांसोबत आजी-माजी पदाधिकारीही आखाड्यात कुटुंबासहित उतरले आहेत. रामभाऊ घाटगे, प्रभाकर वाघीकर, गोपिनाथ तुडमे, बाळासाहेब जामकर या जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना तिकिटे मिळवून दिली आहेत. यातील एकाने तर पत्नी आणि सुनेला वेगवेगळ्या गटांत शिवसेनेकडून उभे केले आहे. विद्यमान अध्यक्ष राजेश विटेकर यांनी आपल्या मातोश्रींना उमेदवारी मिळवून दिली आहे. उपाध्यक्ष राजेंद्र लहाने हे स्वतः निवडणूक लढवीत आहेत. विद्यमान सभापती दादासाहेब टेंगसे, माजी सभापती गणेश रोकडे यांच्या पत्नी तर माजी सभापती मीनाक्षी निरदुडे, चित्रा गोळेगावकर यादेखील रिंगणात आहेत. परभणीचे नगरसेवक असलेले शिवाजी भरोसे, विश्वजित बुधवंत यांनी कुटुंबातील सदस्याला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उतरविले आहे. 

मेहुण्यांसाठी मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला 
नातलगांच्या उमेदवारीत मेहुणे मंडळीही मागे नाही. पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांचे मेहुणे शिवहरी खिस्तेहे देखील निवडणूक लढवीत असल्याने लोणीकरांनी त्यांच्या प्रचारासाठी बुधवारी (ता. आठ) ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची सभा घेतली. माजी खासदार गणेशराव दुधगावकर यांनी आपले मेहुणे प्रताप कदम यांना उमेदवारी देत त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com