परभणीकरांना मिळणार चार दिवसांआड पाणी...

धर्मापुरी येथील जलशुध्दीकरण केंद्र.
धर्मापुरी येथील जलशुध्दीकरण केंद्र.

परभणी : महापालिकेच्या महत्प्रयासानंतर येलदरी (ता.जिंतूर) येथून धर्मापुरी येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत गुरुत्वदाबाने पाणी पोचले असून येत्या दोन-तीन दिवसांत ते पाणी शहरातील जलकुंभांमध्ये सोडण्याची चाचणी घेतली जाणार आहे. त्यानंतरच्या नळजोडण्यांसह उर्वरीत शिल्लक किरकोळ कामे झाल्यास संपूर्ण शहराचा पाणीप्रश्न चार-दोन महिन्यांत मार्गी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे दहा ते पंधरा दिवसांनंतर होणारी पाणीपाळी चार ते पाच दिवसावर येऊ शकते.

महापालिका सद्यस्थितीत राहाटी येथील बंधाऱ्यातून पाणीपुरवठा करते. परंतु ही योजना केवळ एक ते दीड लाख लोकसंख्येची असून त्यामुळे शहराच्या निम्म्या भागालाच पाणी मिळत असे. त्यातच ‘यूआयडीएसएसएमटी’ (विशेष पाणीपुरवठा योजना) अंतर्गत येलदरी उद्भव असलेली योजना तत्कालीन नगरपालिकेला मिळाली. परंतु, ती योजना विविध कारणांनी वेळेत पूर्ण होऊ शकली नव्हती. म्हणून शहराचा पाणीप्रश्न बिकट झाला होता.
उन्हाळ्यात तर अभूतपूर्व पाणीटंचाईचे चटके शहरातील नागरिकांना वर्षानुवर्षांपासून बसत आहेत. तसेच दर उन्हाळ्यात पाणीटंचाई निवारणासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात असत. परंतु, पाणीटंचाई  काही दूर होत नसे.

महापालिकेच्या अस्तित्वानंतर योजनेला गती
महापालिका स्थापन झाल्यानंतर सन २०१२ पासून या योजनेला गती मिळण्यास सुरवात झाली होती. तत्कालीन महापौर प्रताप देशमुख व संगीता वडकर, उपमहापौर भगवान वाघमारे यांच्यासह तत्कालीन आयुक्त सुधीर शंभरकर यांनी गती देण्याचा प्रयत्न केला, तर आयुक्त राहुल रेखावार यांनी खऱ्या अर्थाने या योजनेला कार्यान्वित केले. जलशुद्धीकरण केंद्रासाठी जागा खरेदी करण्याचा पालिकेच्या इतिहासात नोंद घेण्यासारखा निर्णय त्यांनी घेऊन तो करून दाखवला. जुन्याच योजनेला केंद्राची अमृत योजना जोडण्यास मंजुरी घेऊन तिला नवसंजीवनी प्राप्त करून दिली. त्यामुळे जलशुद्धीकरण केंद्र व अन्य उपांगांचा प्रश्न मार्गी लागला होता.

विद्यमान आयुक्तांचा पाठपुरावा
आयुक्त श्री. राहुल रेखावार यांची बदली झाल्यानंतर ही योजनेतील कामे गतीने पूर्ण करण्यासाठी विद्यमान आयुक्त रमेश पवार यांनीदेखील जाणीवपूर्वक प्रयत्न केले. विशेष म्हणजे शहराचा पायाभूत विकास करण्याकडे त्यांचा कल असून ही योजना लवकरात लवकर पूर्ण करून शहराची पाणीटंचाई दूर करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून आला. माजी मंत्री सुरेश वरपुडकर, महापौर मीना वरपुडकर यांनीदेखील त्यांना स्वातंत्र्य दिल्यामुळे शहरातील जलकुंभ, जलवाहिन्यांची कामे मार्गी लागली.

जलशुद्धीकरण केंद्राचे काम पूर्ण...
धर्मापुरी येथील जलशुद्धीकरण केंद्र व शहरातील पाच ते सहा जलकुंभांची कंत्राटे औरंगाबाद येथील एका एजन्सीला देण्यात आली होती. 
या एजन्सीचे प्रकाश मुंढे यांनी ही कामे वेळेत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार नोव्हेंबरअखेर ही कामे पूर्णत्वास आली आहेत. येलदरी येथून येणाऱ्या पाण्याच्या दोन ते तीन चाचण्यादेखील पूर्ण झाल्या आहेत. शुक्रवारी (ता.२९) पुन्हा एक चाचणी घेण्यात येऊन जलशुद्धीकरण केंद्रातील कारंजे, तेथील टॅंकमध्येदेखील पाणी सोडण्यात आले. या कामासाठी पालिकेचे क्षेत्रीय अभियंता बालाजी सोनुले, महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाचे प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार जी. व्ही. देशमुख यांनीदेखील वेळेत कामे पूर्ण करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

नवीन नळजोडण्या देण्याचे आव्हान...
शहरातील सर्व जुन्या नळधारकांनासह नव्यानेदेखील नळजोडण्या दिल्या जाणार असून त्यासाठी एजन्सीदेखील दिली जाणार आहे.
त्यासाठीचे नियोजन आयुक्त रमेश पवार करीत आहेत. बोगस नळ जोडण्या राहू नयेत यासाठीदेखील ते नियोजन करीत असल्याची माहिती असून लवकरच ही कामे मार्गी लागणार आहेत. महापौर अनिता सोनकांबळे, उपमहापौर भगवान वाघमारे यांनी पदभार घेतल्यानंतर त्यासाठीचा प्रस्ताव पहिल्याच सर्वसाधारण सभेत पुढे ठेवला जाणार असल्याचे समजते.


 

नागरिकांच्या अपेक्षांची होणार पूर्तता....
धर्मापुरी व शहरातील काही काही कामे शिल्लक आहेत. परंतु, येत्या चार-दोन दिवसांत शहरातील जुन्या व काही नव्या जलकुंभांना पाणी सोडून चाचणी घेण्याची शक्यता आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यास, सद्य:स्थितीत कार्यान्वित असलेल्या जलवाहिन्यांद्वारे ते नागरिकांना सोडले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे दहा ते पंधरा दिवसांनंतर होणारी पाणीपाळी चार ते पाच दिवसांवर येऊ शकते.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com