सतत सूचना देण्याने मूल ऐकणे बंद करते ः डॉ. अपर्णा अष्टपुत्रे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 जानेवारी 2019

 औरंगाबाद -  ""सतत सूचना देत राहिल्याने मूल तुमचे ऐकणे बंद करते. न ओरडता, एकदा व्यवस्थित समजावून सांगितल्यावर मुले आई-वडिलांचे ऐकतात. मुलांवर ओरडण्यापेक्षा सांगण्याची पद्धत बदला,'' असा सल्ला मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अपर्णा अष्टपुत्रे यांनी पालकांना दिला. 

 औरंगाबाद -  ""सतत सूचना देत राहिल्याने मूल तुमचे ऐकणे बंद करते. न ओरडता, एकदा व्यवस्थित समजावून सांगितल्यावर मुले आई-वडिलांचे ऐकतात. मुलांवर ओरडण्यापेक्षा सांगण्याची पद्धत बदला,'' असा सल्ला मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अपर्णा अष्टपुत्रे यांनी पालकांना दिला. 

"सकाळ माध्यम समूह' आणि "महिला मंडळ, औरंगाबाद' यांच्यातर्फे शनिवारी (ता. 26) विद्यार्थी आणि पालकांसाठी खास कार्यशाळा घेण्यात आली. औरंगपुऱ्यातील शिशुविहार शाळेच्या प्रांगणात झालेल्या या कार्यशाळेला सुमारे साडेचारशे विद्यार्थी आणि दीडशे पालकांची उपस्थिती होती. व्यासपीठावर संस्थेच्या सचिव संगीताताई देशमुख, मंदाताई कुलकर्णी, कल्याणी मेढेकर, करुणा वैद्य आणि मुख्याध्यापिका उषा नाईक उपस्थित होत्या. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ. अपर्णा अष्टपुत्रे आणि समुपदेशक, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. संदीप शिसोदे यांनी पालकांशी संवाद साधला. पालकांनीही आपल्या पाल्याविषयीच्या शंकांचे आणि वर्तणुकीच्या समस्यांचे निराकरण करून घेतले. 

 

पालकांसाठी... 

 • आपली मुले जशी आहेत, तसा त्यांचा स्वीकार करा 
 • इतर मुलांशी तुलना करू नका 
 • अत्यंत आवश्‍यक असल्याशिवाय हट्ट पुरवू नका 
 • मुलांना ठाम "नाही' म्हणायला शिका 
 • सतत चौकशा करण्यापेक्षा मुलांशी गप्पा मारा 
 • मुलांचे कौतुक करा, चांगल्या कृतीला प्रतिसाद द्या 

 
विद्यार्थ्यांसाठी...

 

 • काही समजले नाही, तर शिक्षकांना वर्गातच विचारा 
 • लिहून, मोठ्याने वाचून केलेला अभ्यास लक्षात राहतो 
 • टीव्ही पाहणे, मोबाईल खेळणे टाळा 
 • भरपूर मैदानी खेळ खेळा 
 • करिअर करायचे असेल तर अभ्यासाशिवाय पर्याय नाही 
 • जंक फूड, बिस्किटे, वेफर्स सतत खाऊ नका 

 

मुले शाळेत सहा ते सात तास असतात. उर्वरित वेळ ते पालकांसोबतच घालवतात. त्यामुळे मुलांच्या निकोप वाढीसाठी पालकांना प्रशिक्षणाची गरज असतेच. याबाबत दोन्ही तज्ज्ञांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केले. "सकाळ'ने हा उपक्रम आमच्या शाळेत राबविला, याबद्दल विशेष आभार. 
- उषा नाईक, मुख्याध्यापिका, शिशुविहार शाळा. 

Web Title: Parentung Workshop in ShishuVihar school