परभणीत दुचाकी चोरास अटक

हस्तगत मोटारसायकली
हस्तगत मोटारसायकली

परभणी : मराठवाड्यातील विविध शहरातून मोटारसायकल चोरून त्यांना तोडून त्यांचे सुटे भाग भंगारात विक्री करणाऱ्या एका चोरास परभणीच्या दहशतवाद विरोधी पथकाने बुधवारी (ता.२१) सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून १४ मोटारसायकल हस्तगत करण्यात पथकाला यश आले आहे.

परभणी पोलिस दलातील दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख फौजदार विश्वास खोले यांना शहरातील हाडको परिसरातील एक व्यक्ती चोरीच्या मोटारसायकल विक्री करत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार श्री. खोले यांनी सहायक पोलिस उपनिरीक्षक श्री.चिंचाणे, भारत नलावडे, अजहर पटेल, आरेफ कुरेशी, दीपक मुदीराज, दयानंद पेटकर, सुधीर काळे यांचे पथक तयार करून बुधवारी (ता.२०) रात्री हडको परिसरातील शेख इरफान शेख जलील (वय १८) याच्या घरावर छापा मारला असता, त्या ठिकाणी पोलिसांना चोरीच्या मोटारसायकली सापडल्या. 

सुटे भागांची भंगारात विक्री 
शेख इरफान शेख जलील हा त्याचा साथीदार साजिद सिद्धिकी यांच्या मदतीने चोरलेल्या मोटारसायकली तोडून त्यांचे सुटे भाग भंगारात विक्री करत, अशी माहिती आरोपी शेख इरफान याने पोलिसांना दिली. वांगी रस्त्यावरील शेख मोईन स. कासीम या भंगारविक्रेत्याला मोटारसायकलींचे सुटे भाग विकण्यात आले होते. पोलिसांनी या तिंघांनाही ताब्यात घेतले. त्यांची चौकशी सुरु आहे. दरम्यान, पोलिसांच्या पथकाने शेख इरफान यांच्या घरातून व ज्या लोकांना चोरीच्या मोटारसायकली विक्री केल्या होत्या, त्यांच्याकडून त्या हस्तगत केल्या. एकूण १४ मोटारसायकली या पथकाने हस्तगत केल्या आहेत. या सर्व मोटार सायकलची किंमत २ लाख ३० हजार रुपये होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणातील आरोपींना मुद्देमालासह पुढील कारवाई करण्यासाठी नवामोंढा पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. सदर कामगिरीबद्दल पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्याकडून दहशतवाद विरोधी कक्षाचे कौतुक करण्यात आले.

जुनी वाहने घेताना घ्या काळजी
शहरातील सर्व जुनी वाहने विक्रेते यांनी वाहन खरेदी करतांना खरेदीचे कागदपत्रे वाहनाचे मॉडल, इंजिन नंबर, चेचीस नंबर पडताळणी करूनच वाहन खरेदी करावे, तसेच भंगार विक्रेते यांनी भंगार खरेदी व विक्री करणारे ग्राहकांचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर, बिल, पावत्या व भंगार साठा संदर्भातील रजिष्टरमध्ये अद्यावत नोंद ठेवणे आवश्यक आहे, असे परभणी दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख विश्वास खोले यांनी ‘सकाळ’ शी बोलताना सांगितले.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com