महमूद दरवाजाच्या कमानीचे चिरे ढासळले; महापालिकेचे झोपेचे सोंग जाईना

संकेत कुलकर्णी
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

गेले वर्षभर या धोकादायक दरवाजाच्या डागडुजीसाठी 'सकाळ'मधून महापालिकेला जागे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भिंतीत उगवलेली झाडे, खिळखिळी झालेली चिरेबंदी, खचलेले गळके छत यामुळे हा दरवाजा कोसळण्याच्या मार्गावर आहे. दरवाजातून सुरू असलेली जड वाहनांची ये-जा या कमकुवत झालेल्या चारशे वर्षे जुन्या बांधकामाला अधिकच नुकसान करत आहे.

औरंगाबाद : पाणचक्कीजवळील ऐतिहासिक मेहमूद दरवाजाच्या कमानीचे दगड रविवारी (ता. 12) रात्री पडायला सुरवात झाली. मध्यरात्रीच्या सुमारास ट्रक धडकल्याचे स्थानिक रहिवाशांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

गेले वर्षभर या धोकादायक दरवाजाच्या डागडुजीसाठी 'सकाळ'मधून महापालिकेला जागे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भिंतीत उगवलेली झाडे, खिळखिळी झालेली चिरेबंदी, खचलेले गळके छत यामुळे हा दरवाजा कोसळण्याच्या मार्गावर आहे. दरवाजातून सुरू असलेली जड वाहनांची ये-जा या कमकुवत झालेल्या चारशे वर्षे जुन्या बांधकामाला अधिकच नुकसान करत आहे. जून महिन्याच्या 22 तारखेला या दरवाजाचे एक भलेमोठे सागवानी कवाड कोसळले. तेव्हाही 'सकाळ'ने प्रशासनाला धारेवर धरले होते. महापौर, आयुक्त, शहर अभियंत्यांनी या दरवाजाच्या संवर्धनाच्या मोठाल्या गर्जना केल्या होत्या. मात्र पुढे काहीही झाले नाही.

महापालिकेने घेतलेले झोपेचे सोंग जाता जाईना झाले आहे. काल रात्री इथून जाणारा ट्रक अंधारात चालकाला अंदाज न आल्याने कमानीला धडकला. ही धडक एवढी जबरदस्त होती, की कमानीसह अख्खे छत हादरले. कमान एका बाजूने मोडून त्यावरील चिरे ढासळायला सुरवात झाली आहे. 

Mehmood Darvaja

या पुलावरून नेहमी जाणारे शाळकरी, घाटी रुग्णालयाचे कर्मचारी, रुग्णांची वाहतूक करणाऱ्या अॅम्ब्युलन्स, पाणचक्की पहायला येणारे पर्यटक, विद्यापीठात जाणारे प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी आणि मॉर्निंग वॉकला जाणारे नागरिक, अशा कुणावरही कधीही आपत्ती ओढवू शकते. तूर्तास नागरिकांच्या आग्रहावरून पोलिसांनी बॅरिकेड्स लावून येथील वाहतूक बंद केली आहे. पण पर्यायी पुलाचे काम आणि दरवाजाचे संवर्धन केल्यानंतरच हा रस्ता खुला करणे योग्य ठरेल, असे मत अनेकांनी 'सकाळ'कडे व्यक्त केले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: The Part of the Mahmud Darwazas Wall were collapse in Aurangabad