पक्षांचे झेंडे येताहेत पक्ष्यांच्या आड

अतुल पाटील
सोमवार, 22 मे 2017

औरंगाबाद - पक्षी पाहू की, पक्षांचे झेंडे, असा प्रश्‍न सिडको चौकात आल्यानंतर नागरिकांच्या मनात येत आहे. हा गोंधळ उडण्याचे कारण म्हणजे, औरंगाबाद महापालिकेत ज्या दोन पक्षांची सत्ता आहे; त्यांना नेमके सौंदर्यीकरण पाहिजे की विद्रूपीकरण? हेच कळालेले दिसत नाही. एवढं नक्‍की की, महापालिकेतील सत्ताधारी पक्षांचे झेंडे हे सौंदर्यीकरणाच्या आड येत आहेत.

औरंगाबाद - पक्षी पाहू की, पक्षांचे झेंडे, असा प्रश्‍न सिडको चौकात आल्यानंतर नागरिकांच्या मनात येत आहे. हा गोंधळ उडण्याचे कारण म्हणजे, औरंगाबाद महापालिकेत ज्या दोन पक्षांची सत्ता आहे; त्यांना नेमके सौंदर्यीकरण पाहिजे की विद्रूपीकरण? हेच कळालेले दिसत नाही. एवढं नक्‍की की, महापालिकेतील सत्ताधारी पक्षांचे झेंडे हे सौंदर्यीकरणाच्या आड येत आहेत.

सिडको चौकातील उड्डाणपुलाच्या पिलरवरील खाचा बुजवून पांढरा रंग दिला जात होता, त्यावेळीच लोकांना मनात उत्सुकता निर्माण झाली होती की, कलरफुल पिलरवर पुन्हा पांढरी लांबी कशासाठी? याचे उत्तर महिनाभरापासून मिळत आहे. मात्र, ती उत्सुकता जाणून घेताना भाजप आणि शिवसेना हे महापालिकेतील सत्ताधारी पक्षच अडथळा ठरत आहे.

इरा इंटरनॅशनल स्कूलने सिडको चौकातील उड्डाणपुलाचे पिलर सौंदर्यीकरणासाठी महापालिकेकडून दत्तक घेतले आहेत. वाघ, गेंडा, हत्ती, माकड, हरीण यांच्यासह रंगीबेरंगी चिमण्या, बगळे, खारुताई, फुलपाखरू एवढेच काय तर परदेशी पाहुणे फ्लेमिंगोही चित्रे चित्रकार समशेर पठाण आणि त्यांच्या टीमने हुबेहूब रेखाटली आहेत. ही चित्रे नागरिकांच्या पसंतीस उतरत आहेत. मात्र, महापालिकेतील सत्ताधारी पक्षांचे झेंडे ही चित्रे पाहू देत नाहीत. उड्डाणपुलाच्या पिलरभोवती लावलेल्या सुरक्षा जाळीवर राजकीय पक्षांच्या झेंड्यांनी आपले स्थान पक्‍के केले आहे. त्या-त्या पक्षांचे नेते येऊन गेले तरी, कार्यकर्त्यांनी लावलेल्या झेंड्याची फडफड सुरूच आहे. महिना उलटला तरी, पक्षांच्या झेंड्यांची फडफड थांबलेली नाही.

जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरुळ लेणी, बिबी का मकबरा, पाणचक्की औरंगाबादेत असल्याने पर्यटकांची वर्दळ असते. त्यांना गौताळ्यातील वन्यजीव अभयारण्य आणि जायकवाडीतील पक्ष्यांच्या अभयारण्याचे तसेच सुकना येथे येणाऱ्या परदेशी पक्ष्यांचेही आकर्षण निर्माण व्हावे, त्याबद्दल माहिती मिळावी शहरातील विविध चौक, उड्डाणपुलाखालील परिसर दत्तक घेतले जात आहेत. एकीकडे चौक सुशोभित करण्यासाठी अनेक संस्था पदरमोड करत आहे, तर दुसरीकडे सुंदर व स्वच्छ शहर ठेवण्याची जबाबदारी असणाऱ्या राजकीय पक्षांकडूनच विद्रूपीकरण करण्याचा प्रकार सुरू आहे.

काय ते पक्षांनीच ठरवावे?
स्वच्छ भारत अभियानाच्या यादीत कुठल्या कुठे फेकले गेल्यानंतर विशेष सभा बोलावणारे महापालिकेतील सत्ताधारी पक्ष याकडे लक्ष देणार आहेत का? महापालिकेला प्रस्ताव दिल्यानंतर याबाबत कोणतेही आडेवेढे न घेता परवानगी मिळते. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर असा खोडसळपणा केल्यास दत्तक घेणारी संस्था किंवा व्यक्‍तीने कुणाकडे दाद मागावी. असे प्रश्‍न निर्माण झाला आहे.

Web Title: party flags