अधिकाऱ्याच्या घरी रंगलेली पार्टी बनली चर्चेचा विषय

birthday
birthday

हिंगोली : गडचिरोली येथील भू-सुरुंगस्फोटामधे जिल्ह्यातील जवान हुतात्मा झाल्यानंतरही जिल्हा प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे बुधवारी ( ता.१) सायंकाळ पासून रंगलेली वाढदिवसाची पार्टी जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे. दुष्काळी परिस्थिती व  जवान शहीद झाल्याची घटना घडलेली असतानाही झालेल्या पार्टीमुळे जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची संवेदनशीलता संपली काय असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे.

हिंगोली जिल्ह्यांमध्ये यावर्षी तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील 38 गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात असून तब्बल 475 ठिकाणी विहीर व विंधन विहीर अधिग्रहण करण्यात आले आहेत. याशिवाय टॅंकरचे प्रस्ताव दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. एकीकडे ग्रामीण भागातील जनता पाण्यासाठी होरपळत असताना दुसरीकडे मात्र प्रशासनाचे अधिकारी सर्वेक्षण व प्रपत्रा च्या नावाखाली टंचाई उपायोजना करण्यामध्ये टाळाटाळ करीत असल्याचे चित्र आहे. अद्यापही जिल्ह्यातून आठ ते दहा टँकरचे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.

दरम्यान गडचिरोली येथील लेंडारी भागात झालेल्या स्फोटांमध्ये हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील एक जवान शहीद झाला आहे. आज दुपारनंतर या घटनेची माहिती मिळाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. ब्राह्मणवाडा भागामध्ये सायंकाळपासून चूलही पेटली नाही. प्रत्येक जण शहीद जवान संतोष चव्हाण यांच्या आठवणीने हेलावून जात आहे.

हिंगोली जिल्ह्यावर शोककळा पसरली असताना दुसरीकडे मात्र जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे सायंकाळी रंगलेली वाढदिवसाची पार्टी चर्चेचा विषय बनली आहे. शासनाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अधिकाऱ्यांकडे या पार्टीसाठी जिल्हाभरातील सर्व अधिकारी झाडून पुसून हजर होते. आमरसा सोबतच पंचपक्वान्न याशिवाय काही प्रमाणात ओली पार्टी देखील आयोजित केली होती. जिल्ह्यातील या घटनेनंतरही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरी झालेली पार्टी चर्चेचा विषय बनली आहे. विशेष म्हणजे या पार्टीच्या आयोजकांनीही कुठल्याही प्रकारची उणीव भासू नये याची पुरेपूर काळजी घेतल्याचे चित्र होते.

 जिल्हा प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे झालेल्या पार्टीमध्ये सर्व विभागांचे अधिकारी झाडून हजर असल्यामुळे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची संवेदनशीलता संपली आहे काय असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या घरी झालेली पार्टी वैयक्तिक स्वरूपाची असली तरी जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी शासनाचे प्रतिनिधित्व करत असल्यामुळे किमान या घटनेमुळे आज आयोजित पार्टीला आवर घालता आला असता अशी चर्चाही सुरू झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com