'या' मतदारसंघातून लढण्यासाठी भुजबळांना कार्यकर्त्यांचे साकडे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

पक्ष काही निर्णय घेणार असेल, तर मी थांबूही शकतो किंवा कोणत्याही मतदारसंघातून लढूही शकतो.

येवला : नाशिकसह येवला मतदारसंघात गेल्या पंधरा वर्षांपासून प्रचंड विकास करून येवल्याचा चेहरामोहरा बदलला आहे. यापुढील काळात दुष्काळाच्या छायेत असलेल्या वैजापूर मतदारसंघाचा विकास करण्यासाठी छगन भुजबळ किंवा कुटुंबीयातील कोणीही सदस्य यांनी वैजापूरमधून निवडणूक लढवावी, यासाठी कार्यकर्त्यांनी छगन भुजबळ यांना साकडे घातले. वैजापूर विकास नागरिक कृती समितीच्या वतीने आज (शुक्रवार) वैजापूर येथे सर्वपक्षीय नेत्यांचे शिष्टमंडळ आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी शेकडो कार्यकर्ते येवला संपर्क कार्यालय येथे उपस्थित होते.

यावेळी प्रहारचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर घोडके, मनसे तालुकाध्यक्ष सुनील गायकवाड, वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष जगन्नाथ गायकवाड, बाबासाहेब गायकवाड, नीलेश चाफेकर, अशोक देवकर, एल.एम.पवार, काशिनाथ गायकवाड, सुभाष गायकवाड, अॅड. साईनाथ दारुंटे, डॉ. वाल्मिक बोढरे, गणेश चांगले, निशांत पवार, प्रा. संतोष विरकर, आबासाहेब गायकवाड, भोरू पवार, चंद्रकांत पेहरकर, साहेबराव पडवळ, विजय बनकर, प्रभाकर पवार, मनोज घोडके, बाळासाहेब शिंदे, पुंडलीक गायकवाड आदी उपस्थित होते. यावेळी भुजबळ यांनी सर्व कार्यकर्त्यांचे मनोगत समजून घेत आभार मानले.

भुजबळ म्हणाले की, मी कुठून उमेदवारी भरावी, याबाबत पक्ष स्तरावर निर्णय घेतला जाईल. कार्यकर्त्यांनी आपल्या भावना लोकप्रतिनिधीकडे मांडणे हा त्यांचा अधिकार आहे. वैजापूर, येवल्यातील कार्यकर्त्यांनी आपल्या भावना मांडल्या मी त्यांचा आदर करतो. विधानसभेची निवडणूक भुजबळ कुटुंबातील केवळ दोनच व्यक्ती लढणार आहेत. एका वेळेस तीन लोक उमेदवारी करणार नाहीत. त्यामुळे माझ्यासाठी सर्व पत्ते खुले आहेत. पक्ष काही निर्णय घेणार असेल, तर मी थांबूही शकतो किंवा कोणत्याही मतदारसंघातून लढूही शकतो, असे त्यांनी यावेळी स्पष्ट करून आपल्या भावना पक्षाच्या वरिष्ठांकडे पोहचवू, असे आश्वासन त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिले.

दरम्यान, येवला मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी 'भुजबळ साहेबांना आम्ही येवल्यातून जाऊ देणार नाही, ते येवल्यातच राहणार' अशा घोषणा देऊन छगन भुजबळ यांनी येवल्यातूनच उमेदवारी करावी यासाठी संपर्क कार्यालयाबाहेर ठिय्या मांडला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Party supporters forced to Chhagan Bhujbal fight for this constituency