शेतीपूरक व्यवसायातून शोधला समृद्धीचा मार्ग

उमरगा : उच्चशिक्षित असलेल्या तरुण शेतकऱ्याने उभ्या केलेल्या कुक्कुटपालनातील गावरान कोंबड्या.
उमरगा : उच्चशिक्षित असलेल्या तरुण शेतकऱ्याने उभ्या केलेल्या कुक्कुटपालनातील गावरान कोंबड्या.

उमरगा (जि. उस्मानाबाद) : नैसर्गिक संकटाच्या विळख्यात अडकलेल्या शेती व्यवसायाला उभारी देण्यासाठी शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. पारंपरिक शेती पद्धतीत बदल करून आधुनिक पद्धतीचा वापर आणि शेतीपूरक व्यवसायाची निवड करून शेती व्यवसाय समृद्ध करण्यासाठी काही शिक्षित तरुणांचा पुढाकार दिसत आहे. 

आधुनिक पद्धतीचा वापर 
उमरगा येथील तरुण शेतकरी सिद्धांत घोडके हे उच्चशिक्षण घेऊनही शेती व्यवसायाला साद घालत आहेत. त्यांनी जोडव्यवसाय म्हणून कुठल्याही शासकीय योजनांचा फायदा न घेता स्वतःच्या खर्चातून कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यांच्या या पहिल्या प्रयत्नाला यश मिळत आहे. शेतीव्यवसाय जिकिरीचा झाला आहे. निसर्गाची साथ मिळत असली तरी अधूनमधून बसणाऱ्या फटक्‍याने केलेली मेहनत मातीमोल होत आहे. कोरडवाहू शेती तर बेभरवशाची झाली आहे. उमरगा येथील सिद्धांत सुनील घोडके यांनी नुकतेच एम. टेक. (स्ट्रक्‍चर) पदवीचे शिक्षण घेतले आहे. वडील अभियंता म्हणून कार्यरत आहेत. सिद्धांतचेही अभियंता होण्याचे स्वप्न होते; परंतु नोकरी मिळण्याची परिस्थिती आणि बंधने याची झंझट सोसण्यापेक्षा शेती व्यवसायातच उन्नती साधण्याचा निश्‍चय केला. कुक्कुटपालनासाठी तीन लाख खर्च करून शेड उभे केले.

दोन महिन्यांपूर्वी गावरान जातीच्या कोंबडीची सातशे, तर कडकनाथ जातीची शंभर पिले बार्शी येथून आणली. त्यासाठी साधारणतः 35 हजारांचा खर्च आला. गेल्या सव्वादोन महिन्यांपासून पिलांना विशिष्ट पद्धतीचे खाद्य आणि पाण्याची सोय शेडमध्ये करण्यात आली. आठ दिवसानंतर दोन्ही जातींच्या कोंबड्या विक्रीसाठी पाठविण्यात येणार आहेत. दरम्यान, वारंवार मागणी करून ही कुक्कुटपालनासाठी वीजजोडणी दिली जात नसल्याने कोंबड्यांना ऊब देण्यासाठी विशिष्ट पद्धतीने कोळशाच्या विस्तवाचा पर्याय करावा लागत आहे. 

शिक्षण महत्त्वाचे असून, केवळ नोकरीसाठी त्याचा उपयोग व्हावा असे नव्हे; शिक्षणाचा उपयोग शेती, व्यवसायासाठीही महत्त्वपूर्ण ठरतो. पाच एकर शेती तलावालगत आहे. त्यातून पाणी मिळणे सोयीचे होते. गेल्या दीड-दोन वर्षांपासून शेती व्यवसायाचा पर्याय निवडला. पाण्याची बचत करून आधुनिक शेती पद्धतीचाही निश्‍चय केला आहे. कुक्कुटपालनाचा पहिला प्रयोग यशस्वी करण्याचा निर्णय घेतला. एकूण खर्चाच्या तुलनेत पहिल्या लॉटमध्ये अधिक फायदा होणार नाही; मात्र दुसरा लॉट चांगला फायद्याचा ठरणार आहे. 
- सिद्धांत घोडके, शेतकरी, उमरगा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com