पैठणच्या खुल्या कारागृहात पुन्हा होणार गूळ उत्पादन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जुलै 2018

पैठण - पैठणच्या खुल्या कारागृहातील बंद पडलेला गूळनिर्मितीचा गुऱ्हाळ प्रकल्प दहा वर्षांनंतर पुन्हा सुरू झाला आहे. खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या, कधी काळी रक्ताने हात माखलेल्या कैद्यांच्या हातून या गोड गुळाची निर्मिती होणार आहे. त्यातून कैद्यांना रोजगारही मिळणार आहे. हा गूळ राज्यातील कारागृहांना पाठविला जाणार असून, कारागृहांची गरज भागल्यानंतर उरलेला गूळ विक्रीसाठी ठेवला जाणार आहे.  

कारागृह प्रशासनाने पाच लाख ३० हजार रुपये खर्चून गुऱ्हाळाची यंत्रणा उभी केली आहे. या गुऱ्हाळ प्रकल्पाचे उद्‌घाटन पैठण येथील प्रथम वर्ग न्यायाधीश ए. जे. कराड यांच्या हस्ते शुक्रवार ता. २९ जून रोजी करण्यात आले. यावेळी कारागृह उपमहानिरीक्षक राजेंद्र धामणे, कारागृह अधीक्षक बी. आर. मोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. गुऱ्हाळ करण्यासाठी कारागृहाच्या शेतीत ३५ एकर उसाची लागवड करण्यात आली आहे. तसेच शंभर एकर ऊसलागवड करण्याचे नियोजन आहे. कारागृहातील शेती उत्पादनातून गूळनिर्मिती केली जाणार असून, यापुढील काळात कारागृहाचा ऊस साखर कारखान्यांना न देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. 

कारागृहाची एकूण शेती ३३५ हेक्‍टर आहे. पोलिस महासंचालक (कारागृह) पुणे डॉ. भारतभूषण उपाध्याय यांनी कारागृहाला भेट दिली असता, त्यांनी बंद पडलेले गुऱ्हाळ सुरू करण्याची कल्पना मांडली. त्यांच्या सूचनेनुसार नियोजन झाले. एक अधिकारी, तीन कर्मचारी यांना कोल्हापूर येथील गूळ पॅटर्न समजून घेण्यासाठी कोल्हापूरला पाठविले होते. त्यानुसार कोल्हापुरी पद्धतीचे गुऱ्हाळ करण्यात येणार आहे. वीस कैद्यांच्या दोन टीम बनविण्यात आल्या आहेत. या टीम आलटून पालटून काम करतील. कैद्यांना प्रत्येकी ६१ रुपये रोज दिला जाणार आहे. गुऱ्हाळ यंत्रणा तयार करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागला. शिल्‍लक गुळाची व्यवस्थापनातर्फे बाजारपेठेत विक्री केली जाणार आहे.

गुऱ्हाळाच्या प्रकल्पाचे बांधकाम कोल्हापूर येथील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली झाले. सात ते आठ टन उसाचे दैनंदिन गाळप केले जाणार आहे. ऑक्‍टोबर महिन्यात प्रत्यक्ष गूळ उत्पादनाला सुरवात होईल. डिसेंबर १०१८ अखेर राज्यातील कारागृहांना गूळ पाठविण्यात येणार आहे. 
- सचिन साळवे, कारागृह अधीक्षक, खुले कारागृह, पैठण.

Web Title: pathan jail jaggery production