या रुग्णालयात रुग्णांपेक्षा कुलपाला महत्व!

तानाजी जाधवर
गुरुवार, 12 एप्रिल 2018

शासकीय अनास्थेमुळे गरीब रुग्णांना विनाकारण आर्थिक भुर्दंड सहन करावा लागल्याने रुग्णातून संताप व्यक्त होत आहे. 

उस्मानाबाद - शासकीय स्त्री रुग्णालयातील सोनोग्राफी सेंटरच्या रुमच्या कुलपाची चावी हरवल्याने तब्बल दिड ते दोन तास महिलांना सोनोग्राफीसाठी तिष्टत बसावे लागले. शिवाय तातडीच्या रुग्णांना खाजगी रुग्णालयात जावे लागल्याचे दिसून आले. शासकीय अनास्थेमुळे गरीब रुग्णांना विनाकारण आर्थिक भुर्दंड सहन करावा लागल्याने रुग्णातून संताप व्यक्त होत आहे. 

याविषयी अधिक माहिती अशी की, शासकीय स्त्री रुग्णालयात सकाळी साडेदहा वाजल्यापासून रुग्णांनी सोनोग्राफीसाठी नंबर लावणे सूरु केले. मात्र वेळ होऊनही सेंटर उघडत नसल्याने विचारणा करण्यात आली तेव्हा कुलुपाची चावीच नसल्याचे समोर आले. एका कुलुपाची काळजी करत प्रशासन रुग्णांच्या जीवाशी खेळ करत असल्याचे दिसून आले. दिड तासानंतर गोंधळ वाढल्याचे पाहुन प्रशासनाकडून दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान कुलुप तोडण्याचा निर्णय घेतला. तोपर्यंत अनेक महिला रुग्णांनी खाजगी दवाखान्यात जाणे पसंत केले. तातडीच्या उपचारासाठी अत्यंत विश्वासाने आलेल्या रुग्णांना शेवटी रिकाम्या हाती जावे लागल्याचे सांगण्यात आले. स्त्री रुग्णालायात जिल्ह्यातून महिला उपचारासाठी येतात, शिवाय बार्शी, वैराग अशा परजिल्ह्यातील ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर रुग्ण दाखल होतात. अशावेळी या रुग्णालयाच्या क्षुल्लक कारणामुळे महिला रुग्णाची हेळसांड होत असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. कुलुप तोडण्यासाठी प्रसासनाने तब्बल दिड तास घालविल्याचे दिसून आले. शिवाय या काळामध्ये आलेल्या महिलांना थेट उद्या येण्याचे रुग्णालाच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले. उपचार रुग्णांच्या स्थितीवर करायचे की, रुग्णालयाच्या असा प्रश्न यानिमित्ताने उभा राहिला आहे. 

सकाळी दहा वाजल्यापासून सोनोग्राफीसाठी रुग्णाला घेऊन वाट पाहत होतो. कुलुपाची चावी नसल्याने उद्या या असे येथील प्रशासनकडुन सांगण्यात आले. आता दिड ते दोन तासानंतर कुलुप तोडले असून यापुढे किती वेळ लागणार याची कल्पना नाही. 
- साहेबराव घोगरे, रुग्णाचे नातेवाईक 

होय काही काळ चावी नसल्याने बंद होते हे खर आहे. पण मला जेव्हा ही माहिती मिळाली त्याच वेळी तत्काळ कुलुप तोडुन सोनोग्राफी सूरु करण्याचे आदेश दिले. त्यानंतर सोनोग्राफी सूरु झाली.
- डॉ. राहुल वाघमारे, अधिक्षक, स्त्री रुग्णालय 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Patients Inconvenience Because Of Women Hospital Negligence