
काहीजण परवानगी न घेता, वैद्यकीय तपासणी न करता लातूर जिल्ह्यात दाखल होत आहेत. अशांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे. त्यामुळे अशा नागरिकांवर प्रशासन, पोलिसांबरोबरच नागरिकांनीही लक्ष ठेवणे गरजेचे आहे. अशा लोकांची माहिती नागरिकांनी तातडीने प्रशासना द्यावी, असे आवाहन पालकमंत्री अमित देशमुख यांनी रविवारी (ता.१७) केले.
लातूर : आंतरजिल्हा आणि आंतरराज्यातून बरेच लोक लातूर जिल्ह्यात येत आहेत. यातील काहीजण वैद्यकीय तपासणी करून आणि रीतसर परवानगी घेऊन येत आहेत. मात्र, काहीजण परवानगी न घेता, वैद्यकीय तपासणी न करता लातूर जिल्ह्यात दाखल होत आहेत. अशांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे. त्यामुळे अशा नागरिकांवर प्रशासन, पोलिसांबरोबरच नागरिकांनीही लक्ष ठेवणे गरजेचे आहे. अशा लोकांची माहिती नागरिकांनी तातडीने प्रशासना द्यावी, असे आवाहन पालकमंत्री अमित देशमुख यांनी रविवारी (ता.१७) केले.
कोरोनामुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या उदगीरमध्ये शनिवारी (ता.१६) एकाच दिवशी कोरोनाचे दहा रुग्ण आढळून आले. त्यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर देशमुख बोलत होते. ते म्हणाले, लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे एकाच दिवशी दहा कोरोना रुग्ण वाढले, ही चिंताजनक बाब आहे. हे सर्व रुग्ण आंतरजिल्हा आणि आंतरराज्यातून आले आहेत. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे त्यांची वेळीच तपासणी झाली. त्यांच्यापासून इतरांमध्ये कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका टळला आहे. सदरील बाब लक्षात घेऊन प्रशासन, पोलिस आणि जनतेने सतर्क राहून बाहेरून येणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवावे. योग्य ती दक्षता घ्यावी.
लातूरात एक दिवसाचा जनता कर्फ्यू, रविवार ठरतोय शांततेचा दिवस
उदगीर तालुक्यातील बोरोळ तांडा येथे हैदराबाद येथून एक तर मुंबई (धारावी) येथून दहा नागरिक आले. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने सजगता दाखवत त्या सर्वांना विलगीकरण कक्षात ठेवले. या सर्वांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत पाठवले. या सर्वांचे तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर मुंबई येथून आलेल्या दहापैकी नऊ तर हैदराबाद येथून आलेला एकाला अशा एकूण दहा जणांना कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. उदगीर येथे त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. बोरोळ तांडा येथील नागरिक आणि प्रशासनाने दाखवलेल्या सतर्कतेमुळे हे रुग्ण सापडले असून त्यांच्यापासून पुढे होणारा प्रादुर्भाव टळला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे ही सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी, असेही देशमुख यांनी सांगितले.