'फ्री-होल्डसम'विषयी सिडकोकडे नागरिकांची विचारणा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

जमिनी फ्री-होल्डसम करण्यास शासनाने मान्यता द्यावी, याविषयी कार्यवाही सुरू असल्याचे सिडकोतर्फे सांगण्यात येत आहे. 

औरंगाबाद : सिडकोमार्फत रहिवासी, वाणिज्य प्रयोजनासाठी वाटप करण्यात आलेल्या भूखंडांचा भाडेपट्टी कालावधी 99 वर्षांकरिता वाढविताना एकरकमी हस्तांतरण शुल्क आकारून, त्या जमिनी फ्री-होल्डसम करण्यास शासनाने मान्यता दिली.

या निर्णयाला दीड महिना झाला तरीही प्रत्यक्षात कुठल्याच हालचाली नाहीत. त्यामुळे याची विचारणा करण्यासाठी नागरिक सिडको कार्यालयात चकरा मारत आहेत. दरम्यान, याविषयी कार्यवाही सुरू असल्याचे सिडकोतर्फे सांगण्यात येत आहे. 

फ्री-होल्डसमच्या निर्णयामुळे जागांचे दर वाढणार आहेत. फ्री-होल्ड झाल्यानंतर खरेदी-विक्री व्यवहारात वाढ होईल, पूर्वी सिडकोतील जागा घेतल्यांनतर 25 टक्‍के बांधल्यावर विक्री करता येत होती. आता ही अट राहणार नाही. तसेच मालमत्ता हस्तांतरण, ट्रान्स्फर ऑर्डर, एनओसी या सिडकोच्या त्रासदायक व्यापातून नागरिकांची सुटका होणार आहे. औरंगाबादेत 32 हजार सिडको मालमत्ताधारकांना याचा फायदा होणार आहे. 

सिडकोच्या मुख्य कार्यालयात याचे नियोजन करण्यात येत आहे; मात्र मुख्य कार्यालयातून फ्री-होल्डचा प्लॅन आला का, याची विचारणा करण्यासाठी सिडको कार्यालयात रोज पाच ते दहा नागरिक येत आहेत. त्यांना या निर्णयाची अंमलबजावणीची प्रतीक्षा आहे. मुख्य कार्यालयाकडून नियोजन सुरू असल्याचे सिडकोचे प्रशासक पंजाबराव चव्हाण यांनी सांगितले. 

फ्री-होल्डविषयी सिडको कार्यालयात विचारणा करण्यासाठी गेलो होतो; मात्र परिपत्रक आलेले नाही, तसेच सिडकोच्या बोर्डातर्फे सध्या फ्री-होल्डची प्रक्रिया राबविताना शंभर टक्‍के फ्री करावे, की शुल्क लावावेत यांची चर्चा सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 
- बद्रीनाथ ठोंबरे, नागरिक.

Web Title: people ask to CIDCO for free holdsum