गुप्तधनासाठी घरात खोदले तीस-तीस फुटांचे खड्डे 

संकेत कुलकर्णी
सोमवार, 3 जून 2019

- चिकलठाण्यात पोलिसांचा मध्यरात्री छापा 
- झडतीत आढळले घरभर मातीचे ढिगारे 
- दोघे मांत्रिक फरार, घरमालकाचा मुलगा ताब्यात 
 

औरंगाबाद  : गुप्तधनाच्या लालसेने घरातच खोदकाम करणाऱ्या कुटुंबावर पोलिसांनी रविवारी (ता. दोन) मध्यरात्री अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीवरून छापा घातला. यावेळी अमावास्येच्या रात्री पूजेसाठी आलेले दोघे मांत्रिक हाती लागले नाहीत; पण घरातल्या चारजणांची पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली. त्यानंतर घरमालकाच्या थोरल्या मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. 

चिकलठाणा परिसरातील चौधरी कॉलनीतील एका गल्लीत आसाराम सपकाळ यांच्या घरात सव्वा ते दीड महिन्यापासून खोदकाम सुरू असल्याची कुणकुण परिसरातील नागरिकांना लागली होती. दिवसा सामसूम असताना मध्यरात्री दोन-तीन जण येऊन खोदकाम करीत. यातील कणभरही माती त्यांनी घराबाहेर न टाकता बैठकीत, खोलीतच ढिगारे घातले. त्यामुळे नागरिकांचा संशय अधिकच बळावला. त्यामुळे नागरिकांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शहाजी भोसले यांच्याशी संपर्क साधून हा प्रकार त्यांच्या कानावर घातला. त्यांनी चिकलठाणा एमआयडीसी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून सापळा रचला. 
मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास पोलिस उपनिरीक्षक सुरेश जारवाल यांच्या नेतृत्वात पथकाने छापा घातला. यावेळी अगोदर घराला आतून कुलूप घातल्याचे दिसून आले. पोलिसांनी दारे वाजवूनही बराच काळ प्रतिसाद आला नाही. पोलिसांनी दम दिल्यानंतर घरातील महिलेने दार उघडले असता आतील दृश्‍य पाहून पोलिस चकित झाले. 

तीस-तीस फूट खोल खड्डे 
पत्र्याच्या दोन खोल्यांच्या घराच्या अंगणात आणि परसात दोन भलेमोठे सहा फूट बाय सहा फूट असे तीस-तीस फूट खोल खड्डे खणल्याचे आढळून आले. घराची झडती घेतली असता, घरभर मातीचे ढीग घातलेले दिसले. तसेच कुणीतरी नुकतीच अंघोळ केल्याच्या खुणाही दिसल्या. त्यावरून पोलिसांनी घरमालक आसाराम सपकाळ, लक्ष्मीबाई सपकाळ आणि त्यांच्या सौदागर व विशाल या दोन मुलांची चौकशी केली. 

उडवाउडवीची उत्तरे 
घरात लावलेली अगरबत्ती, वाळलेल्या हार-फुलांनी भरलेल्या पिशव्या आणि दोन खोल खड्डे गुप्तधनाच्या आशेनेच खणल्याचे स्पष्ट दिसत असूनही पोलिसांच्या प्रश्‍नांना त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. "घराचे बांधकाम सुरू आहे. तळघर आणि पार्किंगसाठी खड्डे खणत आहोत,' असे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मात्र, त्यांच्या उत्तरांनी समाधान न झाल्यामुळे पोलिसांनी सौदागर आसाराम सपकाळ यास ताब्यात घेतले. 

नागरिकांची एकच गर्दी 
महिनाभरापासून दबक्‍या आवाजात चर्चा करणाऱ्या गल्लीतील नागरिकांनी रविवारी मात्र गोंधळ सुरू केला. पोलिसांच्या छाप्यावेळी परिसरातील शेकडो नागरिक त्या ठिकाणी गोळा झाले. त्यातीलच एकाने खड्ड्यात उतरून शोध घेतला असता आणखी आडवे बोगदे खणण्याची तयारी असल्याचे सांगितले. मात्र, लोकांची गर्दी पाहून मांत्रिक आलेच नाहीत, असेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: people tried to find treasure in house at Aurangabad