नेत्यांच्या हुबेहूब नकला अन्‌ हश्‍शांचे फवारे

राजेंद्रकुमार जाधव
सोमवार, 24 एप्रिल 2017

आपल्या कलेतून मिळणारी 25 टक्के रक्कम अनाथ आश्रमाला देऊन उर्वरित 75 टक्के रक्कम उदरनिर्वाहासाठी वापरतो, असे सांगून स्त्रीभ्रूण हत्या रोखण्याचा संदेश देण्यासाठी आपण एका अनाथ मुलीला दत्तक घेतले असल्याचेही श्री. पटेल यांनी या वेळी सांगितले.

उस्मानाबाद : नेत्यांच्या हुबेहूब नकला, एकच गाणे वेगवेगळ्या कलाकारांकडून कसे गायिले जाईल, शाळांची तपासणी करताना अधिकाऱ्यांनी विद्यार्थी, शिक्षक व मुख्याध्यापकाला विचारल्यानंतर दिली जाणारी उत्तरे अन्‌ त्यातून होणारे विनोद सादर करीत राज्यभरातून आलेल्या अनेक कलाकारांनी रसिकांची अडीच तास करमणूक केली. 

अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनात दुसऱ्या दिवशी शनिवारी (ता.22) रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाच्या प्रांगणातील बापू लिमये रंगमंचावर दुपारी एकपात्री प्रयोग सादर झाले. नियोजित वेळेपेक्षा दीड तास विलंब झाला तरीही रसिकांची मोठी गर्दी होती.

पुणे येथील कलावंत संतोष चोरडिया यांनी माल हा विनोद सादर केला. बससेवा बंद झाल्यामुळे नियोजित कार्यक्रमाला झालेला विलंब, हा प्रसंग त्यांनी सादर केला. शिवाय केस विंचरताना अनेकींच्या ओठावर तरळणारे गीत सशक्‍त अभिनयातून त्यांनी सादर केले.

कोल्हापूरच्या मनीष आपटे यांनी माप, प्रवृत्ती हे विनोद सादर करून राज्य व देशपातळीवरील विविध पक्षांच्या नेतेमंडळींच्या नकला करीत शैलीदार संवादातून रसिकांना खळखळून हसविले.

शिरूर (जि. परभणी) येथील कलाकाराने शाळा तपासणीसाठी आलेले अधिकारी व मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांमधील प्रसंग सादर केला. अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे देताना मुख्याध्यापक, शिक्षकांची उडालेली भंबेरीतून होणारे विनोदी किस्से सादर केले. विष्णू सुरासे (औरंगाबाद), श्रद्धा तेलंग (नागपूर) यांच्यासह अनेक कलाकारांनी आपल्या विनोदी शैलीने रसिकांना खळखळून हसवत वाहवा मिळविली. अनेक कलाकारांनी विविध वेशभूषा परिधान करून आपल्या कलेचे सादरीकरण केले. 

अंध कलाकारांचा कसदार अभिनय 
एकपात्री कार्यक्रमात अमरावती येथील अंध कलाकार रिझवान पटेल यांनी प्रयोग सादर केला. त्यांनी सादर केलेले विनोद, बासरीवादनाला रसिकांनी मोठी दाद दिली. श्री. पटेल यांनी एकच मराठी गीत नामवंत गायकांकडून कसे गायिले गेले असते, हे त्या त्या कलाकारांच्या आवाजात सादर केले. याशिवाय बासरी वादनातून विविध पक्ष्यांचे आवाज काढून टाळ्यांचा कडकडाट मिळविला.

कुत्र्यांची भांडणे कशी सुरू होतात, त्याचे चार प्रकार सादर केले. कुत्रे समोरासमोर आल्यानंतर, भांडणाला सुरवात केल्यानंतर, भांडणे करताना आणि त्याचवेळी एकाद्या व्यक्तीने त्या कुत्र्याला दगड मारल्यानंतर ओरडणे कसे असते, हे त्यांनी हुबेहूब आवाज काढून सादर केले. आपल्या कलेतून मिळणारी 25 टक्के रक्कम अनाथ आश्रमाला देऊन उर्वरित 75 टक्के रक्कम उदरनिर्वाहासाठी वापरतो, असे सांगून स्त्रीभ्रूण हत्या रोखण्याचा संदेश देण्यासाठी आपण एका अनाथ मुलीला दत्तक घेतले असल्याचेही श्री. पटेल यांनी या वेळी सांगितले.

Web Title: Performance in Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan