नकली सोने गहाण ठेऊन बँकेला 17 लाखांचा गंडा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 एप्रिल 2019

परळीच्या अ‍ॅक्सिस बँकेत नकली सोने गहाण ठेवून एकूण 17 लाखांचे कर्ज उचलल्याची घटना उघडकीस आली आहे.

परळी : बँकेने नेमलेल्या मूल्यमापक सोनाराने मित्रांसोबत संगनमत करून तिघा खोट्या कर्जदारांच्या मार्फत परळीच्या अ‍ॅक्सिस बँकेत नकली सोने गहाण ठेवून एकूण 17 लाखांचे कर्ज उचलल्याची घटना उघडकीस आली आहे. बँकेच्या वार्षिक लेखा परीक्षणात हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तिन्ही कर्जदारांसह मूल्यमापक सोनारावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

सोने तारण कर्ज देण्यासाठी प्रत्येक बँकेकडून अधिकृतरीत्या सोने मूल्यमापकाची नेमणूक करण्यात येते. ग्राहकाकडून कर्जमागणीचा अर्ज आल्यानंतर मूल्य मापकाकडून सोन्याच्या गुणवत्तेचा व किंमतीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच कर्ज देण्यात येते. परळी येथील अ‍ॅक्सिस बँकेच्या शाखेकडून सीमा ज्वेलर्सचे व्यंकटेश वैजनाथ डुबे याची अधिकृत मूल्यमापक म्हणून नेमणूक करण्यात आली होती.

परंतु, मागील वर्षी डिसेंबर महिन्यात मूल्यमापक डुबे यानेच काही मित्रांसोबत बँकेलाच गंडा घालण्याचा कट रचला आणि नकली कर्जदार बँकेत पाठविले. त्यात सागर राजेंद्र धोकटे (रा. धोकटे गल्ली, परळी) याने 147 ग्राम सोने तारण ठेऊन दोन लाख 99 हजारांचे कर्ज उचलले. रमेश दगडूबा फड याने 452 ग्राम सोन्याच्या बदल्यात नऊ लाख 34 हजार आणि गोविंद बालासाहेब सोनवणे (दोघेही रा. सुभाष चौक, परळी) याने 224 ग्राम सोने तारण ठेऊन चार लाख 63 हजार असे तिघांनी एकूण 16 लाख 96 हजार रुपयांचे कर्ज उचलले.

या तिन्ही कर्ज प्रकरणात सोन्याचे मूल्यमापन व्यंकटेश डुबे याने केले होते. त्यानंतर 2019 मध्ये बँकेचे वार्षिक ऑडीट सुरु असताना सदरील सोने नकली असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे बँकेने अधिक चौकशी केली असता मूल्यमापक डुबे यानेच खोटे कर्जदार हाताशी धरून नकली सोने बँकेत जमा केले. नंतर खोटा अहवाल देत कर्ज रक्कम उचलून बँकेची फसवणूक केली असा घटनाक्रम अ‍ॅक्सिस बँकेचे व्यवस्थापक अरुण आनंद किट्टद यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आला आहे.

Web Title: A Person fraud with Bank of Rs 17 Lakhs