आता सुमारे तीस किलो सोन्याच्या विटांचा शोध!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जुलै 2019

सीसीटीव्हीचा आधार
सोने गहाण ठेवलेल्या फायनान्स कंपनीत कर्जाची रक्कम भरण्यासाठी जैनसोबत सेठिया जात असल्याची बाब समोर आली. त्यामुळे पोलिस तेथीलही फुटेज मिळवीत आहेत; तसेच जैनच्या ॲक्‍सिस बॅंकेच्या खात्यावर रक्कम टाकण्यात आली होती. तेथील तसेच जीबीआर टंच लॅब येथे सोने वितळून घेतले त्यावेळीचे काही फुटेज मिळते का, याची पोलिस चाचपणी करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

औरंगाबाद - राजेंद्र जैनने स्वस्तात विकलेले पंचवीस ते तीस किलो सोने ‘जडगाववाला’ ज्वेलर्सच्या मालकाने वितळविण्यास दिले होते. त्यानंतर त्याच्या विटा तयार करण्यात आल्या असून, या विटा कुठे आहेत, कुणाच्या ताब्यात आहेत, याचा शोध एसआयटी पथक घेत आहे. 

वामन हरी पेठे ज्वेलर्सचे सुमारे ६५ ते ६७ किलो सोन्याचे दागिने चोरीप्रकरणी जडगाववाला ज्वेलर्सचा मालक राजेंद्र सेठिया (५४, रा. उस्मानपुरा) याला अटक झाली. राजेंद्र जैनच्या चौकशीत सेठियाचे नाव समोर आले होते. जैनने सेठियाला दागिने दिल्याचे सांगितल्यानंतर सेठियाची चौकशी झाली; परंतु त्याच्याकडून फारशी माहिती पोलिसांना मिळाली नाही. दागिने सेठियाला दिल्यानंतर त्याचे टॅग काढून ते वितळविण्यात आले. ही प्रक्रिया टंच लॅबमध्ये डिसेंबर २०१८ ते जून २०१९ यादरम्यान झाली. टंच लॅबमध्ये तयार करण्यात आलेल्या सोन्याच्या विटा/लगड कुठे आहेत, त्याची विक्री झाली का, त्याचे पुन्हा अलंकार तयार करण्यात आले का, ते तयार केले गेल्यास त्याची सद्यःस्थिती काय आहे याबाबत उगलडा पोलिस करीत आहेत. मणप्पुरम, मुथूट व आयएफएल या फायनान्स कंपन्यांनी सोने पोलिसांना दिल्यानंतर आता वितळवून तयार केलेल्या विटांचाही शोध पोलिस घेत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pethe Jewellers Gold Theft Gold Bricks Searching Crime