‘जडगाववाला’ सेठिया अटकेत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 जुलै 2019

स्वस्तात सोन्याची विक्री 
जैनने २२ हजार रुपये तोळा याप्रमाणे सेठियाला सोने विकले. कधी ३० किलो, तर कधी ४० किलो सोने विकले. पण, तेव्हाचे आता आठवत नाही, असेही तो सांगत असल्याचे गुन्हे शाखेच्या सूत्रांनी सांगितले.  

जैन, राणेच्या कोठडीत वाढ
राजेंद्र जैन, अंकुर राणे, लोकेश जैन यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यावर तिघांना न्यायालयासमोर हजर केले असता मुख्य न्यायदंडाधिकारी एम. एन. मोटे यांनी राजेंद्र जैनला १२ जुलैपर्यंत, तर राणेला दहा जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

औरंगाबाद - वामन हरी पेठे ज्वेलर्सप्रकरणी आता आर्थिक गुन्हे शाखेने सराफांभोवती फास आवळण्यास सुरवात केली आहे. ‘जडगाववाला’ ज्वेलर्समध्ये सोमवारी (ता.८) छापा टाकून पोलिसांनी तपासणी केली, त्यानंतर राजेंद्र सेठिया याला सोने चोरी केल्याच्या आरोपावरून अटक केली. 

राजेंद्र जैनच्या चौकशीतून राजेंद्र सेठिया या सराफाचे नाव समोर आले. त्याच्याकडे चोरीचे दागिने विकल्याचे जैन याने सांगितले. त्यावरून पोलिसांनी सोमवारी कासारीबाजार येथील जडगाववाला दुकान गाठले. काही तास तेथे पोलिसांनी तपासणी केली, तसेच सेठिया याचीही चौकशी केली. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सेठियाला अटक केली. दुकानातून तूर्तास कोणतेही सोने, दागिने जप्त केले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई उपनिरीक्षक अमोल देशमुख, सहायक पोलिस निरीक्षक सुभाष खंडागळे आदींनी केली. ‘जडगाववाला ज्वेलर्स’ या दुकानातून लॅपटॉप, पावतीपुस्तके व इतर काही दस्तऐवजही पोलिस पथकाने जप्त केले. पेठे प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर सेठिया तीन ते चार दिवस गायब होता, असे सूत्रांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pethe Jewellers Theft Crime ankur rane rajendra jain lokesh jain