अबब..! दागिने वितळवून ‘जडगाववाला’ने बनविल्या विटा!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जुलै 2019

कोठडीदरम्यान जैनने उघडले तोंड 

  • चोरलेल्यापैकी बरेच सोने मणप्पुरम गोल्ड फायनान्समध्ये गहाण ठेवले. 
  • पैशांची गरज असल्याने त्याने जडगाववाला ज्वेलर्सच्या राजेंद्र सेठियाला सोने सोडविण्यासाठी सांगितले.
  • सेठियाने २२ लाख रुपये प्रती किलोप्रमाणे सोने विकत घेण्याचे मान्य केले व त्यानुसार जैनच्या ॲक्‍सेस बॅंकेच्या खात्यावर रक्कम टाकली. 
  • राजेंद्र जैन व सेठियाचा चुलतभाऊ अनिल सेठियासोबत जाऊन मणप्पुरममधून दागिने सोडवून घेतले. 
  • दागिने अनिल सेठियाकडे दिल्याचे जैन याने कोठडीदरम्यान सांगितले. 
  • सेठियाने खरेदी केलेले सोने जी.बी.आर टंच लॅब सराफाकडून वितळून घेत विटा, लगड बनविल्याचे जैन याने पोलिसांना सांगितले.

औरंगाबाद - पैशांची गरज असल्याने राजेंद्र जैनने ‘जडगाववाला’ ज्वेलर्सचा मालक राजेंद्र सेठियाला मणप्पुरम फायनान्समधील सोने सोडविण्यास सांगितले. सेठियाने सोने सोडवत स्वस्तात खरेदी केले व रक्कम राजेंद्र जैनच्या बॅंक खात्यात टाकली. विशेषत: सेठियाने स्वस्तात घेतलेले सुमारे पंचवीस ते तीस किलो सोने वितळवून त्याच्या विटा बनविल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

वामन हरी पेठे ज्वेलर्सचे सुमारे ६५ किलो सोन्याचे दागिने चोरीप्रकरणी सोमवारी (ता.आठ) रात्री जडगाववाला ज्वेलर्सचा मालक राजेंद्र सेठिया (५४, रा. उस्मानपुरा) याला अटक झाली. त्यानंतर त्याला न्यायालयात नेण्यात आले असता शुक्रवारपर्यंत (ता.१२) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी एम. ए. मोटे यांनी मंगळवारी (ता.नऊ) दिले. याप्रकरणी पेठे ज्वेलर्सचा व्यवस्थापक अंकुर राणे याला १०, तर राजेंद्र जैन याला १३ जुलैपर्यंत न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली.

सहा महिने दागिने वितळवण्याचा ‘उद्योग’
पोलिसांनी टंच लॅबमधील कर्मचारी प्रवीण मुळीक व गणेश इंगवले यांची चौकशी केली असता, डिसेंबर २०१८ ते जून २०१९ दरम्यान राजेंद्र सेठिया व त्याचा मुलगा श्रेयांश सेठिया यांच्यासोबत राजेंद्र जैन व लोकेश जैन यांनी २५ ते ३० किलो सोन्याचे दागिने वितळवून त्याच्या विटा, लगड बनविल्याचे सांगितले.

याचा होणार तपास
जैनने सोने गहाण ठेवलेल्या बॅंक व फायनान्स कंपनीत सेठिया व सेल्समन असलेला त्याचा चुलतभाऊ अनिल सेठिया हे त्या कर्जाची रक्कम भण्यासाठी जैनसोबत जात होते. त्यामुळे सेठियाने सोने तारण कर्जाची किती रक्कम भरली; तसेच सोने कोठे ठेवले याचा तपास पोलिसांचे एसआयटी पथक करणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pether Jewellers Gold Theft Gold Bricks Crime