‘फायजर’ने औरंगाबादेतून गाशा गुंडाळला!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 जानेवारी 2019

औरंगाबाद - औषधनिर्माण क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असलेल्या फायजरने चेन्नई, औरंगाबादेतून आपला गाशा गुंडळण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही शहरांतील अनुक्रमे १००० आणि ७०० जणांच्या रोजगारावर कुऱ्हाड कोसळणार असून नववर्षात ही कंपनी आपला औरंगाबादेतील कारभार बंद करणार आहे. 

औरंगाबाद - औषधनिर्माण क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असलेल्या फायजरने चेन्नई, औरंगाबादेतून आपला गाशा गुंडळण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही शहरांतील अनुक्रमे १००० आणि ७०० जणांच्या रोजगारावर कुऱ्हाड कोसळणार असून नववर्षात ही कंपनी आपला औरंगाबादेतील कारभार बंद करणार आहे. 

अग्रगण्य औषधनिर्माण कंपनी असलेल्या फायजरने औरंगाबाद आणि चेन्नई (आयकेकेटी) येथील प्लॅंट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. येथे उत्पादन घेणे परवडणारे नाही आणि या प्लॅंटसाठी मिळणाऱ्या ऑर्डर सातत्याने घटत गेल्याने कंपनीने औरंगाबाद आणि चेन्नई येथील उत्पादन वर्ष २०१९ मध्ये थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. २०१९ मध्ये वाळूज आणि चेन्नईतील कारखाने पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय झाला असून त्याची औपचारिकता किती दिवस चालेल, याबाबत कंपनीने धोरण स्पष्ट केलेले नाही. मात्र, लवकरात लवकर हे कारखाने बंद केले जाणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. औरंगाबाद आणि चेन्नईतील फायजरचे प्लॅंट निर्यातीसाठीची औषधी बनवितात आणि भारतीय बाजारात येथून कोणतेही उत्पादन येत नाही. औरंगाबाद आणि चेन्नईतील प्लॅंट बंद करण्यात येणार असले तरी विशाखापट्टणम, गोवा आणि अहमदाबाद येथील कंपनीच्या कारभारावर याचा परिणाम होणार नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

सतराशे जणांचे काय करणार?
औरंगाबादेतील प्लॅंटमध्ये काम करणाऱ्या सातशे आणि चेन्नईमधील १००० अशा एकूण सतराशे कर्मचाऱ्यांना याविषयी वेळोवेळी सांगण्यात येणार असल्याचे म्हटले असले तरी या कामगारांचे कंपनी नेमके काय करणार, याबाबत कोणतेही स्पष्टीकरण फायजरकडून आलेले नाही. हाताला काम नसलेल्या सातशे जणांना अन्य प्लॅंटमध्ये सामावून घेणार की नाही, याबाबत कंपनीने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.

Web Title: Pfizer Company Close in Aurangabad