2020 पासून PG-CET होणार बंद!

2020 पासून PG-CET होणार बंद!

औरंगाबाद : आपल्याच विद्यापीठाच्या पदवीवर आपण शंका घेतोय की काय?'' अशी प्रतिक्रिया नोंदवत 2020 पासून पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी कोणतीही प्रवेश पूर्व परीक्षा होणार नाही. यावर्षीची पीजीसीईटी शेवटचीच असून, त्यातही रिक्‍त जागा राहिल्या. पदवीच्या गुणांवरच प्रवेश देण्यात येतील, अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी दिली. 

व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीनंतर गुरुवारी (ता. 25) डॉ. येवले पत्रकारांशी बोलत होते. "विद्यापीठात दहा दिवसात आढावा घेतल्यानंतर लक्षात येते, की किमान दोन महिने डॅमेज कंट्रोल साठी लागतील, असे डॉ. येवले म्हणाले.

"पीजीसीईटी रद्द करुन यावर होणारा लाखो रुपयांचा भुर्दंड वाचणार आहे. परीक्षा आपणच घेतो, पदवी आपणच देतो. पुन्हा सीईटी घेऊन पीजीला प्रवेश देणे म्हणजे आपल्याच पदवीवर शंका घेण्यसारखे आहे. कॉपी करणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. ते जास्त स्कोअर करु शकत नाहीत. त्यांच्यासाठी 95 टक्‍के गुणवंतांना वेठीस धरणे योग्य नव्हते. यापुढे पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी पदवीच्या गुणांवरच केंद्रीय पद्धतीने प्रवेश देण्यात येतील. तसेच एकाच फॉर्मवर, एकाच क्‍लिकवर संबंधित विद्याशाखांच्या विभागाच्या परीक्षा विद्यार्थ्यांना देता येतील.'' असे डॉ. येवले यांनी सांगितले. 

* विद्यापीठ प्रशासनातील ढिसाळता दुर करुन सात महिन्यांपासून रखडलेली कामे महिनाभरात पुर्ण करणार आहे. 
* विद्यापीठाचा आरसा म्हणून परीक्षा विभागाकडे पाहिले जाते. गुणपत्रिका, पदवी वाटप हे प्राधान्य असेल. 
* 2018चा पदवीदान ऑगस्ट महिन्याच्या शेवटी तर, 2019 चा पदवीदान नोव्हेंबरमध्ये घेण्यात येईल. 
* पीएच. डी. सेंटरची माहिती दहा दिवसात घेऊन त्यानंतर पेटची तारीख जाहीर करण्यात येईल. 
* विद्यापीठातील माजी विद्यार्थ्यांचे योगदान घेत विद्यापीठातील दवाखाना कार्यान्वित केला जाईल. 
* पुढील वर्षी विद्यापीठातील सर्वच अभ्यासक्रम सुधारीत केले जातील. कौशल्य शिक्षणावर भर राहील. 
* पीएच.डी.चे स्टॅन्डर्ड जपण्यासाठी सामाजिक उपयोग, स्थानिक, आंतरराष्ट्रीय गरज लक्षात घेऊन परवानगी देण्यात येईल. 
* विद्याठातील तीनही इन्क्‍युबेशन सेंटर पुर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात येतील. 
* विद्यापीठातील पारदर्शक कारभारासाठी "ऑनलाईन फाईल ट्रॅकिंग सिस्टीम' सुरु केली जाईल. 

'सीएचबी'साठी दोन दिवसात जाहिरात 

विद्यार्थ्यांना शिक्षक मिळणे गरजेचे असल्याने विद्यापीठातील रिक्‍त 117 जागा 'सीएचबी'वर केंद्रीय पद्धतीने भरल्या जातील. दोन दिवसात जाहिरात काढण्यात येईल. यासाठी किमान दोन महिने लागतील. विद्यार्थ्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळावे, यासाठी प्रयत्न करणार आहे. असे डॉ. येवले यांनी सांगितले. 

संविधानिक पदेही लवकरच भरणार 

विद्यापीठात कुलसचिव, परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक तसेच चार अधिष्ठातांच्या जागा रिक्‍त आहेत. त्यास आचारसंहितेची अडचण येऊ नये, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली आहे. त्यानंतर त्या जागाही भरल्या जातील. यावेळी डॉ. येवले यांनी प्र-कुलगुरुंबाबत भाष्य टाळले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com