‘पिएचसीं’ना मिळणार नव्या रुग्णवाहीका

File photo
File photo

नांदेड : मराठवाडा वैधानिक विकास मंडळाकडून जिल्ह्यातील मानव विकास योजनेतंर्गत तालुक्यांना सात कोटी २८ लाखांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतुन नऊ तालुक्यातील ३१ प्राथमीक आरोग्य केंद्रांना (पीएचसी) नव्या रुग्णवाहीका उपलब्ध होणार आहेत. वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांच्याकडे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी प्रस्ताव दिला असून त्याला मंजुरीही मिळाली आहे.    


जिल्हा नियोजन भवनात गुरुवारी (ता. २८) डॉ. कराड यांच्या समवेत बैठक झाली. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सुरेश थोरात, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी जी. बी. सुपेकर, जिल्हा उपनिबंधक प्रविण फडणीस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एम. आर. रत्नपारखी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी पवार, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी चंदनसिंग राठोड आदी उपस्थित होते.

सात कोटी २८ लाखांचे प्रस्ताव सादर
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी जिल्ह्यातील मानव विकास कार्यक्रम क्षेत्र अंतर्गत नऊ तालुक्यात असलेल्या एकूण ३१ प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका नादुरुस्त तसेच बंद अवस्थेत असल्यामुळे ग्रामीण भागातील गरोदर मातांचे तसेच रुग्णांचे हाल होतात. त्यामुळे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी ही बाब हेरुन ३१ रुग्णवाहिकेसाठी चार कोटी दहा लाख निधीचा प्रस्ताव सादर केला. तसेच महिला आर्थिक विकास महामंडळातंर्गत कार्यरत असलेल्या महिला बचत गटांसाठी बैलचलित बहुउद्देशीय शेती यंत्र ‘शेतकरी स्वयंरोजगार किट’साठी एक कोटी ५९ लाख, टेलरिंग युनिट गारमेंट सेंटरसाठी ७५ लाख, हिमायतनगर तालुक्यातील महिला बचतगटाला खवा तयार करण्याच्या यंत्रांसाठी सहा लाख १५ हजार, मेदन कल्लूर (ता. देगलूर) येथील पुदीना शेतीसाठी शीतवाहन व इतर अनुषंगिक साहित्यासाठी साडेतीन लाख, धर्माबाद तालुक्यातील महिला बचत गटांसाठी मसाला ग्रहउद्योगासाठी १४ लाख २२ हजार असे एकूण सात कोटी २८ लाखांचे प्रस्ताव वैधानिक विकास महामंडळाकडे सादर केले. 

नाविन्यपूर्ण उपक्रमांची दखल शासनाने घ्यावी
बैठकीत जिल्हा उपनिबंधक प्रविण फडणीस यांनी शेतकऱ्यांनी उत्पादन केलेल्या सोयाबीन ग्रेडिंग मशीनसाठी एक कोटी दहा लाख उपलब्ध करून देण्याची मागणी केली. यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन डॉ. कराड यांनी दिले. बैठकीत जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या कर्करोग निदान विशेष नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिली. या उपक्रमाची अध्यक्षांनी विशेष प्रशंसा करुन याबाबत अहवाल शासनास सादर करण्याच्या सूचना त्यांंनी दिल्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी गर्भवती मातांसाठी अंगणवाडी येथे सामूहिक दुपारचे जेवण व त्यानंतर देण्यात येणाऱ्या लोहयुक्त औषधी गोळ्यांचे सेवनाबाबत माहिती दिली. याचीही दखल डॉ. कराड यांनी घेवुन या कामांबाबत जिल्हाधिकारी अरुण डोंगरे व अशोक काकडे यांचे कौतुक केले. नांदेडमधील विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाची दखल शासनाने घ्यावी असे, डॉ. कराड यांनी सूचित केले. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com